मोदींनंतर दिल्लीच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार? अमित शाह-योगींच्या चर्चेला मोठा ट्विस्ट; उपराष्ट्रपतींच्या एका विधानाने दक्षिण भारतात नवी आशा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचे नेतृत्व कोणाकडे जाणार? अमित शाह, योगी आदित्यनाथ की शिवराज सिंह चौहान? या नावांभोवती सुरू असलेल्या चर्चेला आता अनपेक्षित वळण मिळाले आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी भविष्यात भारताचा पंतप्रधान तामिळनाडूमधील तमिळ व्यक्ती होऊ शकतो, असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना नवी दिशा मिळाली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या या वक्तव्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते विजय यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

तामिळनाडूच्या पसुमपोन येथे दौऱ्यावर असताना आणि मदुराईतील प्रसिद्ध मीनाक्षी अम्मन मंदिराला भेट दिल्यानंतर पत्रकारांनी राधाकृष्णन यांना भविष्यात भारताचा पंतप्रधान कोण होऊ शकतो, असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी कोणत्याही नेत्याचे नाव न घेता तमिळ व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचण्याची शक्यता असल्याचे सांगितले. भारतात कोणत्याही राज्यातील व्यक्तीला पंतप्रधान होण्याची संधी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कर्नाटकातून देवेगौडा, गुजरातमधून मोदी; आता तामिळनाडूची वेळ?

या प्रश्नाला उत्तर देताना उपराष्ट्रपतींनी देशाच्या राजकीय इतिहासाचा संदर्भ दिला. कर्नाटकातून एच. डी. देवेगौडा यांनी पंतप्रधानपद भूषवले, तर गुजरातमधून नरेंद्र मोदी देशाचे नेतृत्व करत आहेत, असे त्यांनी नमूद केले. मात्र, तामिळनाडूमधून अद्याप एकही व्यक्ती पंतप्रधान झालेली नाही, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

त्याचवेळी तामिळनाडूने देशाला तीन राष्ट्रपती आणि तीन उपराष्ट्रपती दिल्याचेही सांगितले. या तीन उपराष्ट्रपतींमध्ये सी. पी. राधाकृष्णन यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, राधाकृष्णन यांनी १९९८ ते २००४ या काळात कोईम्बतूरमधून भाजपचे खासदार म्हणून काम केले आहे.
विजय यांच्या चाहत्यांना विधानातून दिसला मोठा संकेत!
उपराष्ट्रपतींच्या वक्तव्याचा संदर्भ घेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना थेट देशाचे पंतप्रधान बनवण्याची मागणी सुरू केली आहे. तमिळ व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते, या विधानाचा रोख विजय यांच्याकडे असल्याचा दावा काही समर्थक करत आहेत. विजय हेच भविष्यात देशाचे नेतृत्व करू शकतात, असा विश्वास त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, उपराष्ट्रपतींनी विजय यांचे नाव घेतलेले नाही.
परिसीमन विधेयकाच्या वादातही पंतप्रधानपदाचा मुद्दा
दुसरीकडे, तामिळनाडू विधानसभेत काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या परिसीमन विधेयकाविरोधात प्रस्ताव मांडण्यात आला होता. या चर्चेत टीव्हीकेचे महासचिव आणि बांधकाम मंत्री अधव अर्जुन यांनी देशातील सत्तेचे केंद्र केवळ उत्तर प्रदेश, बिहार किंवा गुजरातपुरते मर्यादित नसावे, अशी भूमिका मांडली. दक्षिण भारतातील तामिळनाडूलाही पंतप्रधानपदाची संधी मिळायला हवी, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानातूनही विजय यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबतचे संकेत असल्याची चर्चा झाली होती.
आता उपराष्ट्रपतींच्या वक्तव्यामुळे या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे. मोदींनंतर भाजपमधील नेतृत्व बदलाची चर्चा सुरू असतानाच दक्षिण भारतातून पंतप्रधान होण्याचा मुद्दा पुढे आल्याने राजकीय समीकरणे कोणते वळण घेणार, याकडे लक्ष लागले आहे. मात्र, पुढचा पंतप्रधान कोण असेल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
