19 ते 24 सप्टेंबर पावसाचा जोर वाढणार? पंजाबराव डख यांनी सांगितला महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज

पुणे : राज्यात यंदा मान्सून उशिराने दाखल झाल्याने पेरण्यांनाही उशीर झाला. ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये मात्र पावसाने काही भागात दडी मारली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पिके पाण्याअभावी संकटात सापडली आहेत. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनसारखी पिकेही शेतातून काढून टाकली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाऊस नसल्याने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी होत आहे. अशातच हवामान आणि पावसाबाबत अंदाज व्यक्त करणारे पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रातील आगामी पावसाबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, 17 ते 19 सप्टेंबरदरम्यान राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

कोणत्या भागात कधी पाऊस होणार?
डख यांच्या अंदाजानुसार, 17 आणि 18 सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस होऊ शकतो. मात्र हा पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा असेल आणि तो सर्वदूर होणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.


यानंतर 19 ते 24 सप्टेंबरदरम्यान दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील काही भागांसह बारामती, दौंड, माणखटाव, इंदापूर, बीड, आष्टी, जामखेड, कर्जत, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि जालना या भागांत 19 ते 24 सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता असल्याचे डख यांनी म्हटले आहे.
पाऊस शेतकऱ्यांसाठी ठरणार नवसंजीवनी?
18 सप्टेंबरनंतर राज्यातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता डख यांनी व्यक्त केली आहे. 17 आणि 18 सप्टेंबरदरम्यान पुणे, मुंबई आणि कोकण पट्ट्यातही पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या काळात आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पाऊस सुरू होण्यापूर्वी शेतातील खुरपणी तसेच इतर आवश्यक शेतीची कामे पूर्ण करून घेण्याचा सल्लाही डख यांनी दिला आहे. दरम्यान, हा अंदाज प्रत्यक्षात आला तर मराठवाडा, विदर्भासह पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
दक्षिण महाराष्ट्रातून पावसाला सुरुवात?
दक्षिण महाराष्ट्रातून बाष्प सक्रिय झाल्यामुळे पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे डख यांनी सांगितले आहे. त्यांच्या अंदाजानुसार, सोलापूरकडून पाऊस लातूरच्या दिशेने पुढे सरकू शकतो. तसेच या पावसाचा प्रभाव विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांतही जाणवण्याची शक्यता आहे.