40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस सुपे घाटात उलटली; भीषण अपघात, अनेक विद्यार्थी जखमी


बारामती : 40 विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या एसटी बसला बारामतीच्या सुपे घाटात अपघात झाल्याची मोठी घटना समोर आली आहे. ही बस सुपे घाटात उलटली असून, या अपघातात चार ते पाच विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

पाटस येथून सकाळी सुमारे सात वाजता ही बस विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. कुसेगाव, पडवी, गायकवाड मळा मार्गे बारामतीच्या सुपे घाटातून ही बस विद्याप्रतिष्ठानच्या संकुलाकडे जात होती. मात्र, सुपे घाटात बसचा अपघात झाला.

या अपघातात चार ते पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी फोनवरून अपघाताची माहिती घेत जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

रोहित पवारांकडून एसटीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडिया पोस्टद्वारे या अपघाताबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी एसटी महामंडळाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

रोहित पवार यांनी म्हटले की, विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस सुपे घाटात उलटल्याची घटना धक्कादायक आहे. काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली असून, सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याच्या जीविताला धोका निर्माण झाला नाही. सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यासोबतच गेल्या आठवड्यात स्वारगेटहून बारामतीला जाणाऱ्या सलग दोन बस बंद पडल्याने प्रवाशांना तिसऱ्या बसमध्ये बसवावे लागले होते, असा दावाही रोहित पवार यांनी केला. या घटनांचा संदर्भ देत त्यांनी एसटी महामंडळाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

या अपघाताची प्रशासनाने तातडीने सखोल चौकशी करावी आणि एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सुनेत्रा पवारांकडून जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस

दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. त्यांनी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक तसेच डॉक्टरांशी दूरध्वनीवरून संवाद साधून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

जखमी विद्यार्थ्यांना आवश्यक ते वैद्यकीय उपचार आणि योग्य आरोग्यसेवा मिळावी, याबाबत त्यांनी डॉक्टरांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!