सुपे घाटात विद्यार्थ्यांची बस उलटताच सुनेत्रा पवारांचा थेट हस्तक्षेप; अधिकाऱ्यांना फोन, जखमींना तातडीने उपचारांचे आदेश


बारामती : चौफुला-सुपे रस्त्यावर आज सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा सुपे घाटात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधत परिस्थितीची माहिती घेतली. जखमी विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांच्यावर तातडीने योग्य उपचार व्हावेत, यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.

विद्या प्रतिष्ठानच्या शाळेतील विद्यार्थी नेहमीप्रमाणे एसटी बसने शाळेकडे जात असताना सुपे घाट परिसरात बस उलटली. बसमध्ये सुमारे ३० ते ४० विद्यार्थी प्रवास करत असल्याची माहिती आहे. अपघातानंतर काही विद्यार्थी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

जखमी विद्यार्थ्यांना तातडीने पाटस, चौफुला आणि लोणी काळभोर येथील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांकडून विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

सुनेत्रा पवारांनी घेतली तातडीने माहिती

अपघाताचे गांभीर्य लक्षात घेत सुनेत्रा पवार यांनी विलंब न करता अप्पर पोलीस अधीक्षक आणि विद्या प्रतिष्ठानच्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी अपघाताची परिस्थिती, जखमी विद्यार्थ्यांची संख्या तसेच त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली.

यावेळी जखमी विद्यार्थ्यांना तातडीने आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. घटनास्थळी तसेच संबंधित रुग्णालयांमध्ये आवश्यक मदतकार्य वेगाने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

पालकांनी घाबरून जाऊ नये, प्रशासनाचे परिस्थितीवर लक्ष

अपघाताची माहिती समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मात्र, जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, संपूर्ण परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली जात आहे.

या घटनेनंतर सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाशी थेट संपर्क साधून जखमी विद्यार्थ्यांच्या उपचारांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्याने मदतकार्याला वेग आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!