दोन प्रियकरांना सोबत घेतलं, पतीला दारू पाजली अन् रात्रीच खेळ संपवला! तलावात मृतदेह फेकून पत्नीने रचला अपघाताचा बनाव; २५ वर्षीय महिलेचं भयंकर सत्य उघड!

कामारेड्डी, तेलंगणा : लग्नानंतरही दोन तरुणांसोबत प्रेमसंबंध सुरू असलेल्या २५ वर्षीय महिलेने स्वतःच्याच पतीच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक घटना तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पतीला दारू पिण्याच्या बहाण्याने बाहेर नेण्यात आले. त्यानंतर दोन्ही प्रियकरांच्या मदतीने त्याचा गळा आवळून हत्या करण्यात आली. एवढंच नाही, तर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तलावात फेकून देत बुडून मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आला. मात्र, पोलिसांच्या तपासाने या कटामागचं धक्कादायक वास्तव समोर आणलं.

मृत तरुणाचे नाव गुम्माडी काशीराम (वय २६) असे आहे. तो बांसवाडा तालुक्यातील हनमाजीपेट गावचा रहिवासी होता. मजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री गावाच्या वेशीवरील ‘पचेरा चेरुवू’ तलावात त्याचा मृतदेह आढळला. सुरुवातीला पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद केली. काशीरामचे वडील चकाली भुमैया यांनी तक्रार दिल्यानंतर तपासाला वेग आला. शवविच्छेदन अहवाल आणि प्राथमिक तपासातील निष्कर्षांमुळे पोलिसांचा संशय बळावला आणि प्रकरण हत्येच्या गुन्ह्यात रूपांतरित झाले.

दोन्ही प्रियकरांची साथ, पत्नीने आखला हत्येचा कट!

तपासात काशीरामची पत्नी गुम्माडी सविता (वय २५) हिचे चिंताकिंडी रामू (वय २६) आणि पसुपूला संतोष (वय २५) या गावातील दोन तरुणांसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. पतीचा कायमचा अडथळा दूर करण्यासाठी तिघांनी मिळून हत्येची योजना आखल्याचा आरोप आहे.

दारूच्या नशेत असताना गळा आवळला, तलावात फेकला मृतदेह!
२३ ऑक्टोबरच्या रात्री काशीरामला दारू पिण्याच्या बहाण्याने बाहेर नेण्यात आले. तो पूर्णपणे नशेत असताना रामूने नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा आवळला, तर संतोषने त्याचे दोन्ही हात घट्ट पकडले. हत्या केल्यानंतर तिघांनी मृतदेह तलावात फेकून दिला, जेणेकरून मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाल्याचे भासेल.
मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या कटाचा पर्दाफाश केला. ३० ऑक्टोबर रोजी पत्नी सविता आणि तिचे दोन्ही प्रियकर रामू व संतोष यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयात हजर केल्यानंतर तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एका पतीच्या हत्येसाठी आखलेल्या या कटामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
