वाहनचालकांच्या जीवाशी खेळ? सेवा रस्त्यालगत सुरक्षाव्यवस्थेशिवाय खड्डा; लोणी काळभोर पोलिस ठाण्यात ठेकेदारावर गुन्हा

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत कोणतीही सुरक्षात्मक उपाययोजना न करता मोठा खड्डा खोदल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एचपी डेपो परिसरात हा प्रकार १४ सप्टेंबर रोजी निदर्शनास आला. सुरक्षाव्यवस्था नसलेल्या या खड्ड्यामुळे वाहनचालक व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

याप्रकरणी लोणी काळभोर वाहतूक विभागातील पोलिस हवालदार विजय बब्रुवान कांबळे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार ठेकेदार चंद्रकांत ज्ञानेश्वर अर्नाळे (वय ४७, रा. पिंपळखुटे, ता. माढा, जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक नियमनासाठी पोलिस पथक कवडीपाट टोलनाका ते नायगाव फाटा परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी कदमवाकवस्ती येथील एचपी डेपो परिसरातील सेवा रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता रस्त्यालगत मोठा खड्डा खोदलेला आढळून आला.
चौकशीदरम्यान हे खोदकाम ठेकेदार अर्नाळे यांनी घेतले असून, जिओ कंपनीच्या कामासाठी ते सुरू असल्याचे समोर आले. मात्र, सार्वजनिक रस्त्यालगत खोदकाम करताना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली कोणतीही सुरक्षाव्यवस्था, अडथळे अथवा खबरदारी घेण्यात आली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
सुमारे २ बाय ४ बाय ३ फूट आकाराचा खड्डा अशा पद्धतीने खोदण्यात आला होता की, रात्रीच्या वेळी तो वाहनचालकांच्या लक्षात न आल्यास अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.
या प्रकरणी पोलिस हवालदार कांबळे यांच्या फिर्यादीवरून ठेकेदार अर्नाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करीत आहेत.