पवारांच्या ८ खासदारांची मोदींसोबत ३० मिनिटे ‘खलबतं’; भारतरत्नपासून शेतकऱ्यांच्या मदतीपर्यंत कोणत्या मागण्या केल्या?


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या आठही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. सुमारे ३० मिनिटे झालेल्या बैठकीत केवळ मतदारसंघातील विकासकामे नव्हे, तर महाराष्ट्राशी संबंधित अनेक महत्त्वाचे सामाजिक, कृषी आणि विकासाचे प्रश्न पंतप्रधानांसमोर मांडण्यात आल्याची माहिती आहे.

या भेटीतील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील थोर व्यक्तींना भारतरत्न देण्याची मागणी. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी खासदारांनी केली. महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तन, शिक्षण आणि समाजप्रबोधनातील त्यांच्या योगदानाचा दाखला देत या मागणीचा विचार करण्याची विनंती करण्यात आली. या प्रस्तावावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणींवरही सविस्तर चर्चा झाली. अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांना मिळणारी आर्थिक मदत आणि सध्याची कृषी परिस्थिती याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी खासदारांनी केली.

शेतीमालाच्या दराचाही मुद्दा पंतप्रधानांसमोर मांडण्यात आला. उत्पादन खर्च वाढत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक दबाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या पातळीवर आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

यासोबतच महाराष्ट्रातील रखडलेले विविध विकास प्रकल्प आणि मतदारसंघांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवरही चर्चा झाली. केंद्राच्या सहकार्याची आवश्यकता असलेल्या कामांना गती देण्याची विनंती खासदारांनी केली. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती आणि राज्याच्या विकासाशी संबंधित विविध मुद्दे एकाच बैठकीत पंतप्रधानांसमोर मांडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान मोदी यांनी खासदारांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले आणि मांडलेल्या प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे. बैठकीनंतर या भेटीचे फोटो आणि व्हिडीओही समोर आले. त्यामुळे ही भेट केवळ विकासकामांपुरती मर्यादित होती की त्यामागे व्यापक राजकीय संदेशही आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या खासदारांनी महाराष्ट्रातील महापुरुषांचा सन्मान, शेतकऱ्यांना मदत आणि रखडलेल्या विकासकामांना गती या प्रमुख मुद्द्यांवर मोदींचे लक्ष वेधल्याचे स्पष्ट झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!