अतिशहाणपणा पुण्यातील तरुणीच्या अंगलट; PSI बनून डॉक्टरांकडे गेली, एका चुकीने बिंग फुटलं

पुणे : त्वचारोग तज्ज्ञांकडे लवकर नंबर मिळवण्यासाठी स्वतःला पोलिस उपनिरीक्षक असल्याचे भासवत खाकी वर्दी परिधान करणाऱ्या 25 वर्षीय तरुणीचा बनाव पुण्यातील कॅम्प परिसरात उघडकीस आला आहे. वर्दीवरील नावाची पाटी चुकीच्या बाजूला लावल्यामुळे डॉक्टरांना संशय आला आणि चौकशीत संपूर्ण प्रकार समोर आला.
या प्रकरणी समिना आफिस इनामदार ऊर्फ समिना पठाण (वय 25, रा. म्हाळुंगे) हिच्याविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस फौजदार महेश शिंदे यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समिना खाकी वर्दी घालून संबंधित क्लिनिकमध्ये आली होती. मात्र तिच्या गणवेशावरील नावाची पाटी नियमानुसार नसल्याने संशय निर्माण झाला. तिने स्वतः बाणेर पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याचे सांगत रात्रपाळीची ड्युटी पूर्ण करून आल्याचा दावा केला होता.


उत्तरांमधील विसंगती लक्षात आल्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली. त्यावेळी ती कोणत्याही पोलिस विभागात कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच खोटी ओळख सांगून पोलिस अधिकारी असल्याचा बनाव करत असल्याचेही निष्पन्न झाले.
प्राथमिक तपासात समिना बारावी उत्तीर्ण असल्याचे समोर आले आहे. पोलिस दलात भरती होण्याची इच्छा अपूर्ण राहिल्याने तिला खाकी वर्दीचे आकर्षण होते, अशी माहिती पुढे आली आहे. तसेच संबंधित त्वचारोग क्लिनिकमध्ये रुग्णांना उपचारासाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने लवकर नंबर मिळवण्यासाठी तिने हा बनाव केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लष्कर पोलिसांकडून सुरू आहे.