थेऊरमध्ये संतापजनक घटना! “तु खूप सुंदर दिसतेस…” म्हणत अकरावीच्या विद्यार्थिनीचा हात पकडून लगट; आरोपीविरोधात पॉक्सो अंतर्गत कारवाई

पुणे : थेऊर परिसरात अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी छेडछाड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “तू खूप सुंदर दिसतेस…” असं म्हणत तरुणाने विद्यार्थिनीचा हात पकडून तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अक्षय साहेबराव चव्हाण (रा. जय मल्हार ढाब्याशेजारी, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या ४० वर्षीय आईने याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना १० किंवा ११ मार्च २०२६ रोजी सकाळी दहाच्या सुमारास चव्हाणवस्ती परिसरात घडल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन विद्यार्थिनी शाळेत जात असताना आरोपी अक्षय चव्हाण याने तिचा हात पकडत “तू खूप सुंदर दिसतेस” असं म्हणत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर सुमारे आठ दिवसांनी पुन्हा एकदा विद्यार्थिनी शाळेत जात असताना दादा गायकवाड यांच्या घराजवळ आरोपी तिच्या जवळ गेला. त्याने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच, “ही बाब कोणाला सांगितली तर तुझ्या वडिलांना मारून टाकीन,” अशी धमकीही आरोपीने दिल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे मुलगी आणि तिचे कुटुंब भयभीत झाले असून परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४, ३५१ (२) तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ च्या कलम ८ अंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.