महाविकासआघाडी फुटण्याच्या उंबरठ्यावर, मोठी माहिती आली समोर …

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्याच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत मोठा राजकीय तणाव निर्माण झाला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी स्पष्ट शब्दांत जाहीर केले आहे की, काँग्रेस पक्ष येत्या बीएमसी निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांसोबतही लढणार नाही.

त्यांच्या या वक्तव्यामुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ उडाला असून, महाविकास आघाडीतील एकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भाई जगताप यांनी सांगितले की, मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना देखील हेच सांगितले होते की, काँग्रेस पक्षाने उद्धव ठाकरेंसोबत जाऊ नये आणि राज ठाकरेंचा तर प्रश्नच येत नाही. आमच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीतही मी रमेश चेन्निथला यांच्या समोर हीच भूमिका स्पष्ट केली होती.

त्यांनी पुढे सांगितले की, या निवडणुका या स्थानिक कार्यकर्त्यांच्या असतात, नेत्यांच्या नाहीत. आमचे कार्यकर्ते अनेक वर्षे पक्षासाठी काम करत आहेत, त्यांनाही निवडणूक लढवण्याची इच्छा असते. त्यामुळे काँग्रेसने या निवडणुका स्वबळावर लढाव्यात आणि कोणासोबत युती करायची हे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनाच ठरवू द्यावे.
भाई जगताप यांच्या या भूमिकेला मुंबई काँग्रेसमध्ये मोठे महत्त्व आहे, कारण ते पक्षाचे निष्ठावंत नेते मानले जातात आणि त्यांना शहरात मोठा कार्यकर्ता वर्ग पाठिंबा देतो. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने काँग्रेसच्या भविष्यातील रणनीतीवर परिणाम होऊ शकतो.
त्यांनी यावेळी महाविकास आघाडीतील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना म्हटलं की, उद्धव ठाकरे जेव्हा महाविकास आघाडीत आले, तेव्हा शिवसेना एकच होती; पण आता दोन शिवसेना झाल्या आहेत. त्यामुळे परिस्थिती बदलली आहे आणि काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा विचार करायला हवा.
दरम्यान, काँग्रेसच्या मीडिया सेल प्रमुख सचिन सावंत यांनी स्पष्ट केले की, भाई जगताप यांची मते त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडली आहेत. पण अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांड घेणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक नेत्यांच्या सल्ल्यानेच लढवल्या जातात. हायकमांड सर्वांची मते ऐकूनच अंतिम निर्णय जाहीर करेल, असे सावंत यांनी सांगितले.
