ओबीसी नेत्यांनी घेतला मोठा निर्णय! मराठा जीआरविरोधात आता….; आरक्षणाचा वाद पेटणार

मुंबई : सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र मिळावे यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारच्या शासन निर्णयाची ओबीसी संघटनांकडून होळी केली जात आहे.

तसेच काही ठिकाणी साखळी उपोषण, मोर्चे काढले जात आहेत. ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्त्व करणारे मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांनी या जीआरविरोधात न्यायालयीन लढाई छेडण्याची तयारी केली आहे.
ओबीसी नेत्यांचे म्हणणे आहे की, सरकारने काढलेला हा जीआर कायदेशीरदृष्ट्या टिकणार नाही आणि यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात येऊ शकते. त्यामुळे या जीआरला त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे.

जीआरमुळे ओबीसींच्या आरक्षणात गोंधळ निर्माण झाला असल्याचा ठपका नेत्यांनी ठेवला आहे. या मुद्द्यावरून राज्यात ओबीसी समाजात तीव्र नाराजी आहे. कायदेशीर लढाईद्वारेच न्याय मिळवावा लागेल, असा सूर अनेक नेत्यांच्या वक्तव्यातून उमटतो आहे.

दरम्यान, सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आवाहन केले आहे की, ३ सप्टेंबर रोजी ओबीसी समाजाने तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन या जीआरची होळी करून निषेध व्यक्त करावा. तसेच तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारच्या या निर्णयाचा निषेध नोंदवावा.