शेतकरी कर्जमाफी योजनेची नवी यादी जाहीर; साडेतीन लाख शेतकऱ्यांचा समावेश, लाभ मिळवण्यासाठी काय करावं?


पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची नवी यादी सहकार विभागाने जाहीर केली आहे. या यादीत राज्यातील 3 लाख 55 हजार 614 शेतकऱ्यांचा समावेश आहे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या यादीत पुणे जिल्ह्यातील 6,648 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

या योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, ‘महाआयटी’मार्फत ही प्रक्रिया राबवली जात आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित झालेली, 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे, तसेच पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित कर्जांना या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे.

12.58 लाख शेतकऱ्यांना लाभ

या योजनेसाठी बँकांनी ‘महाआयटी’च्या पोर्टलवर एकूण 31.17 लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली होती. संगणकीय प्रक्रियेनंतर 16.96 लाख पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी 24 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली.

यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या 12.58 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर 10,114.90 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामध्ये 7 ऑगस्ट रोजी 6.22 लाख शेतकऱ्यांना 5,028.60 कोटी रुपये, तर 24 ऑगस्ट रोजी 6.36 लाख शेतकऱ्यांना 5,086.30 कोटी रुपये कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.

दरम्यान, नव्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्यातील थकबाकीची खातरजमा करणे आवश्यक आहे. त्यानंतर जवळच्या आपले सेवा केंद्रात आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा केली जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!