राष्ट्रवादीच्या आमदाराला वादग्रस्त वक्तव्य भोवलं; अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय, कारवाई होणार?

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना राष्ट्रवादीच्या आमदाराला चांगलाच दणका बसला आहे. अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या सततच्या वादग्रस्त विधानावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले आहेत. वारंवार समज देऊन ही काही सुधारणा होत नसल्याने त्यांनी मोठा निर्णय घेत संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दिपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी केवळ हिंदू लोकांच्याच दुकानातून खरेदी करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे वाद ओढावला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, खरंतर अरुणकाका जगताप जोपर्यंत हयात होते. तोपर्यंत सगळं तिथं सुरळीत होतं. परंतु आता काही लोकांना आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे. आपल्या वडिलांचे छत्र हरवले आहे. त्यावेळेस आपण जबाबदारीने वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. त्यांनी सुधारणा करणार असं बोलले होते. मात्र ते सुधारणा करताना दिसत नाहीत. त्यामुळे त्याची जी भूमिका आहे. त्याचे जे विचार आहेत. ते पक्षाला अजिबात मान्य नाहीत. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल.अशी स्पष्ट भूमिका अजित पवारांनी जाहीर केली.

निवडणुकीचा आधीच संग्राम जगताप यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आणि त्यांना त्यावर त्यांची बाजू मांडावी लागेल असे समोर येत आहे.

