गणेशोत्सवासाठी एसटीचा मेगा प्लॅन! कोकण मार्गावर धावणार 5,220 जादा बसेस; गट आरक्षण, सवलतींसह प्रवाशांसाठी खास व्यवस्था

मुंबई : गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांना यंदा मोठा दिलासा मिळणार आहे. वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 7 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत कोकणातील विविध मार्गांवर तब्बल 5,220 जादा बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून, यासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
मुंबई सेंट्रल येथील एसटी मुख्यालयात झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत या नियोजनाला अंतिम स्वरूप देण्यात आले. बैठकीला परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. यंदा 14 सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत असल्याने दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या गावी रवाना होणार आहेत. हीच गर्दी लक्षात घेऊन यंदा अतिरिक्त बससेवा सुरू करण्यात येणार आहे.

एसटी प्रशासनाने यंदा प्रवाशांसाठी आरक्षण प्रक्रियाही अधिक सुलभ केली आहे. जादा बसेसचे आरक्षण अधिकृत संकेतस्थळ, एमएसआरटीसीच्या मोबाईल ॲपद्वारे तसेच सर्व प्रमुख बसस्थानकांवरील आरक्षण केंद्रांमधून करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना शेवटच्या क्षणी तिकीटासाठी होणारी धावपळ टाळता येणार आहे.


याशिवाय 10 ऑगस्टपासून किमान 40 प्रवाशांच्या गटासाठी विशेष गट आरक्षण सुविधा सुरू होणार आहे. या योजनेअंतर्गत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के भाडे सवलत, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के भाडे सवलतीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कुटुंब, गणेश मंडळे आणि एकत्र प्रवास करणाऱ्या गटांना मोठा फायदा होणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक सुरळीत राहावी यासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील प्रमुख बसस्थानकांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली विशेष नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहेत. अतिरिक्त कर्मचारी तैनात केले जाणार असून प्रवाशांना तातडीने मदत मिळावी यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.
कोकणातील प्रमुख महामार्गांवर बसमध्ये बिघाड झाल्यास त्वरित मदत मिळावी म्हणून विशेष दुरुस्ती पथकेही तैनात केली जाणार आहेत. त्यामुळे बससेवा अखंड सुरू राहील आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास एसटी प्रशासनाने व्यक्त केला आहे.
आषाढी एकादशी यात्रेदरम्यान जादा बससेवेला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर यंदा गणेशोत्सवासाठीही अधिक व्यापक नियोजन करण्यात आले आहे. नफा-तोट्याचा विचार न करता प्रत्येक चाकरमान्याला सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर सेवा देण्यावर एसटीचा भर राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि नियोजनबद्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.