मॉन्सूनची माघार अन् ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट


मुंबई : मॉन्सूनच्या परतीची प्रक्रिया सुरू असतानाच राज्यातील हवामानात मोठा बदल जाणवत आहे. अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली असून, उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. मंगळवारी (6 ऑक्टोबर) मालेगावमध्ये राज्यातील सर्वाधिक 38.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जळगाव, सोलापूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि वर्धा येथेही पारा 37 अंशांच्या पुढे गेला.

दरम्यान, आज 7 ऑक्टोबर रोजी गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्येही विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, उर्वरित महाराष्ट्रात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे.

राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव

महाराष्ट्राच्या निम्म्या भागातून मॉन्सूनने माघार घेतली असून, त्याचा परिणाम हवामानावर दिसून येत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला आहे. ऑक्टोबर महिन्यातील वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

पश्चिम बंगालच्या हिमालयीन भागापासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रापर्यंत समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच केरळच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मध्य महाराष्ट्रापासून मन्नारच्या आखातापर्यंतही कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

मालेगावमध्ये सर्वाधिक 38.4 अंश तापमान

राज्यातील बहुतांश भागांत तापमान 35 अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाचा तडाखा जाणवत आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत मालेगावमध्ये 38.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

याशिवाय जळगाव, सोलापूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि वर्धा येथे 37 अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदवण्यात आले. धुळे, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशीम येथेही पारा 36 अंशांच्या पुढे होता.

दुसरीकडे, धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी 17 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये कमाल आणि किमान तापमानात मोठी तफावत पाहायला मिळत आहे.

गडचिरोलीसह कोल्हापूर-सिंधुदुर्गला पावसाचा अंदाज

आज गडचिरोली जिल्ह्यात विजांसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतही विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

कोकणात कुठे पाऊस?

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. मात्र, सिंधुदुर्गमध्ये विजांसह वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्रात कोरडे हवामान

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर परिसरात पावसाची शक्यता कमी आहे. या भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची शक्यता मर्यादित

पुणे, पुणे घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूरमध्ये प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. मात्र, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात विजांसह वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

मराठवाड्यात उकाडा वाढण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे या भागात सध्या पावसापेक्षा उष्णता आणि उकाड्याचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता आहे.

विदर्भात गडचिरोलीला पावसाचा इशारा

अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी विशेष पावसाचा अंदाज नाही. मात्र, गडचिरोलीमध्ये वादळी पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!