ओमर अब्दुल्लांच्या अडचणी वाढल्या! मंत्रिमंडळ विस्तारानंतर २१ आमदार नाराज; खासदारही सोडणार पद

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नॅशनल कॉन्फरन्समधील अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. पक्षातील तब्बल २१ नाराज आमदारांनी एकत्र येत बैठक घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच श्रीनगरचे खासदार आगा रुहुल्ला मेहदी यांनी ३ नोव्हेंबरला पक्षासह खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केल्याने पक्षासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

शुक्रवारी माजी मंत्री आणि आमदार कैसर जमशेद लोन यांच्या निवासस्थानी नाराज आमदारांची बैठक पार पडली. मंत्रिमंडळ विस्तारात अपेक्षित संधी न मिळाल्याने अनेक आमदार नाराज असल्याचे समोर आले आहे. मंत्रिमंडळात दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या मंत्र्यांना बदलून इतर आमदारांना संधी द्यावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.

नाराज आमदारांच्या मागण्यांसाठी समिती स्थापन

नाराज आमदारांनी जून महिन्यात श्रीनगरमधील दाचीगाम येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करण्याची मागणीही केली आहे. या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आमदार नझीर गुरेझी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती लवकरच पक्षाध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेऊन आमदारांच्या मागण्या मांडणार आहे.

आगा रुहुल्ला यांच्या भूमिकेमुळे पक्षाची चिंता वाढली
दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार आगा रुहुल्ला मेहदी यांनी ३ नोव्हेंबर रोजी पक्षाचा आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय कायम ठेवल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमधून ही भूमिका स्पष्ट केली. तसेच या दिवशी बडगाममध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चार नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार करत चार नव्या मंत्र्यांना संधी दिली. मात्र, या विस्तारात सतीश शर्मा यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. मंत्रिपदाची अपेक्षा असलेल्या काही आमदारांची निराशा झाल्याने पक्षातील नाराजी वाढल्याचे चित्र आहे.
या बैठकीत राजौरी-पुंछ भागातील आमदारांचाही सहभाग होता. थन्नामंडीचे आमदार मुझफ्फर इक्बाल खान यांनी आपल्या मतदारसंघाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व न मिळाल्याबद्दल यापूर्वीच नाराजी व्यक्त केली होती. पुंछ-हवेलीचे आमदार एजाज जान आणि बुढालचे आमदार जावेद इक्बाल चौधरी हेही बैठकीला उपस्थित होते.
मुबारक गुल यांना सरचिटणीस पदावरून हटवले
पक्षातील नाराजीच्या पार्श्वभूमीवर फारुख अब्दुल्ला यांनी मुबारक गुल यांना सरचिटणीस पदावरून हटवले आहे. मंत्रिपद न मिळाल्याने गुल नाराज असल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे, या पदावर नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच त्यांना पदावरून दूर करण्यात आले.
एकीकडे २१ आमदारांची नाराजी, तर दुसरीकडे आगा रुहुल्ला यांच्या राजीनाम्याची घोषणा यामुळे नॅशनल कॉन्फरन्ससमोरील आव्हाने वाढली आहेत. पक्षाचे नेतृत्व नाराज नेत्यांची समजूत काढण्यात यशस्वी ठरणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
