किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलांनी डोक्यात कोयत्याने वार करून केला युवकाच्या खुनाचा प्रयत्न, पुण्यातील घटनेने खळबळ…

पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

किरकोळ कारणावरून तिघा अल्पवयीन मुलांनी युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गौरव सोनकांबळे ( वय १८, रा. अप्पर इंदिरा नगर) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

बिबवेवाडी पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ही घटना अप्पर इंदिरा नगर येथे रविवारी दुपारी पावणे चार वाजता घडली.
गौरव सोनकांबळे आणि तिघा अल्पवयीन मुलांमध्ये किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती.

त्यातून त्यांच्यातील एकाने गौरव सोनकांबळे याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्ताच्या थारोळ्यात गौरव पडल्यावर हल्लेखोर मुले पळून गेली. बिबवेवाडी पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी गौरव सोनकांबळे याला ससून रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी सांगितले की, गौरव सोनकांबळे याच्यावर रात्री ऑपरेशन करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
