पुण्यात हवामान खात्याचा पावसाचा इशारा, कुठे आणि कधी बरसणार? जाणून घ्या महत्वाची माहिती…

पुणे : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. कारण आजचा दिवस बदलत्या पुणेकरांसाठी हवामानाचा अनुभव देणारा ठरणार आहे. सकाळी ढगाळ वातावरण, दुपारी उन्हाचा चटका आणि सायंकाळी हलक्या सरी असा अनुभव बुधवारी १५ ऑक्टोबर रोजी नागरिकांनी घेतला.

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शहरात गारवा निर्माण झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी १६ऑक्टोबरला पुणे आणि आसपासच्या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे.

बुधवारी पुणे शहर आणि उपनगरांमध्ये हलक्या सरींचा अनुभव आला. वारंवार बदलणारे हवामान नागरिकांना दिवसभर सतर्क ठेवत आहे. सकाळी गार वारा, दुपारी तापलेले वातावरण आणि सायंकाळी ढगांचा खेळ, असा हवामानाचा रंग दिसून आला.

काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी वातावरणात गारवा आणला. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, पुणे आणि परिसरात पुढील २४ तासांत हलक्या स्वरूपाच्या सरी येण्याची शक्यता आहे. हवामानातील ओलावा आणि कमी दाबाचे क्षेत्र हे या पावसाचे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बदलत्या हवामानाचा परिणाम पुण्यावरही होत आहे.
तसेच, पावसामुळे शहरात धूळ आणि उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हवामानातील या बदलामुळे वातावरण प्रसन्न झाले असून, संध्याकाळच्या फिरण्यासाठी अनुकूल हवा निर्माण झाली आहे.
कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बुधवारी तुरळक पाऊस पडला. मात्र, विदर्भात हवामान कोरडेच राहिले. कोकण-गोव्यात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात वाढ दिसून येत आहे. हवामान खात्याने गुरुवारी १६ आणि शुक्रवारी १७ ऑक्टोबरला कोकण व मराठवाड्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे.
दरम्यान, हवामानशास्त्र विभागाच्या मते, सध्या महाराष्ट्राच्या विविध भागांत वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींचा क्रम सुरू राहण्याची शक्यता आहे. पुणे परिसरात दिवसाचे तापमान ३२ अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याची आणि रात्री थोडा गारवा जाणवण्याची शक्यता वर्तवली आहे.
