‘पडून मृत्यू’चा बनाव फसला? गर्भवती पत्नीच्या गळ्यावरील खुणांनी उघड झाला थरार; सैन्यदलातील जवानासह तिघे जेरबंद

कारंजा : वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू सुरुवातीला अपघात असल्याचे सांगितले गेले. मात्र, मृतदेहावरील संशयास्पद खुणा आणि माहेरच्यांच्या तक्रारीनंतर हे प्रकरण थेट हत्येपर्यंत पोहोचले. भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या जवानासह त्याचे आई-वडील आता पोलिसांच्या ताब्यात असून, तपासात धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
कारंज्यातील शिवनगर परिसरात राहणारा 28 वर्षीय ज्ञानेश्वर मदने हा भारतीय सैन्याच्या सहाव्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत आहे. त्याची पत्नी दीपाली सात महिन्यांची गर्भवती होती. गुरुवारी दुपारी ज्ञानेश्वरने दीपाली घरात काम करताना पडल्याने गंभीर जखमी झाल्याचे सांगत तिच्या नातेवाईकांना फोन केला. तिला रुग्णालयात दाखल केल्याचेही सांगण्यात आले. ही माहिती मिळताच दीपालीचे आई-वडील आणि भाऊ मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथून कारंज्याकडे रवाना झाले.

मात्र, रुग्णालयात पोहोचल्यावर त्यांना दीपाली मृत अवस्थेत आढळली. तिच्या गळ्यावर असलेल्या खुणा पाहून नातेवाईकांना संशय आला. त्यानंतर दीपालीचा भाऊ राहुल माने यांनी पोलिसांत फिर्याद दाखल करत बहिणीची हत्या झाल्याचा आरोप केला. या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवत ज्ञानेश्वर मदने आणि त्याच्या आई-वडिलांना अटक केली.


तक्रारीनुसार, ज्ञानेश्वरचे दुसऱ्या महिलेशी कथित अनैतिक संबंध होते. याच कारणावरून तो दीपालीचा वारंवार छळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी या वादावरून दोन्ही कुटुंबीयांमध्ये बैठक झाली होती. त्यावेळी समेट झाल्याचे सांगितले जात असले, तरी त्यानंतरही दीपालीला त्रास सुरूच होता, असा दावा तिच्या नातेवाईकांनी केला आहे.
पोलिसांनी प्राथमिक तपासात मृतदेहावरील गळ्याच्या खुणा, घटनास्थळावरील परिस्थिती आणि नातेवाईकांनी केलेले आरोप यांची गंभीर दखल घेतली. त्यामुळे अपघाती मृत्यूऐवजी हत्या झाल्याचा संशय बळावला आणि त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक तपास आणि आरोपींच्या जबाबांनंतर या प्रकरणातील सत्य अधिक स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे कारंजा शहरासह संपूर्ण वाशिम जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. गर्भवती महिलेच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, कथित प्रेमसंबंधांचा या प्रकरणाशी संबंध आहे का आणि मृत्यूच्या आधी नेमके काय घडले, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. तपासातील निष्कर्ष आणि वैद्यकीय अहवालानंतर या गूढ मृत्यूचे संपूर्ण सत्य समोर येण्याची शक्यता आहे.