मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट! पुरावे थेट फडणवीसांना देणार, नेमकं काय म्हणाले? राज्यात चर्चांना उधाण


मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा उल्लेख असलेली ऑडिओ क्लिप ऐकवली होती. या कथित क्लिपमध्ये एकनाथ शिंदे यांना भाजपकडून ५०० कोटी रुपये देण्यात आल्याचा आणि ही रक्कम श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत पाठवल्याचा दावा असल्याचे सांगण्यात आले होते. ही क्लिप समोर आल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर गंभीर आरोप करत नवा गौप्यस्फोट केला आहे.

‘ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही’ – जरांगे

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही. कारण या प्रकरणात भाजपचे लोक असल्याचा माझा दावा आहे. त्यांच्यावर कारवाई केली तर भाजप मराठा समाजातून संपेल आणि कारवाई केली नाही तर मराठा समाज शिंदे साहेबांपासून दूर जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सामान्य माणसाच्या बाबतीत अशी घटना घडली असती, तर आधी गुन्हे दाखल करून अटक केली असती आणि त्यानंतर एसआयटी नेमली असती. मात्र या प्रकरणात आधी एसआयटी नेमण्यात आली, पण गुन्हे दाखल झाले नाहीत किंवा कारवाई झाली नाही, असा आरोपही त्यांनी केला.

‘क्लिप बाहेर कशी गेली, याचाच त्यांना धक्का’

या प्रकरणात पैशांपेक्षा ऑडिओ क्लिप बाहेर कशी आली, याचीच अधिक चर्चा संबंधितांकडून होत असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला. पैशांचं काहीही होवो, पण ही क्लिप बाहेर गेली कशी, हाच त्यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे ते म्हणाले.

‘माझ्या विरोधात बोलणाऱ्यांना पैसे द्या’

यावेळी जरांगे पाटील यांनी आणखी एक गंभीर आरोप केला. सरकारची एक नवीन मोहीम सुरू झाली असून, जरांगे पाटलांच्या विरोधात जो बोलेल त्याला लागतील तेवढे पैसे द्या, असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला.

या सर्व आरोपांचे पुरावे आपण देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या या नव्या आरोपांवर सरकार आणि संबंधित नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!