विधान परिषद निवडणुकीआधी राज्यात मोठी खळबळ! काँग्रेसचे 60 नगरसेवक फरार, नेमकं घडतंय काय?

नागपूर : राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं असून, पूर्व विदर्भात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचे अंतिम चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. असे असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची पळवापळवी सुरू झाली आहे.

यामध्ये आता चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे तब्बल 60 हून अधिक नगरसेवक अचानक संपर्काबाहेर गेल्याची माहिती समोर आली आहे. काही महत्त्वाचे नगरसेवकांचे मोबाईल फोन ‘नॉट रिचेबल’ लागत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले, सध्या निवडणुका म्हणजे उत्सव झाले आहेत. आमच्याही संपर्कात भाजपचे १०० हून अधिक नगरसेवक आहेत. त्यांच्या पक्षातही अंतर्गत वाद आहेत. दुसरा गट तयार आहे आम्हाला मदत करायला, परंतु आम्ही त्या भानगडीत पडत नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. राजकारण, समाजसेवा ही काही प्रामाणिक माणसांची राहिलेली नाही. आता तर ती पूर्ण उद्योगपतींच्या हातात जाईल, असेही ते म्हणाले.

काही नगरसेवकांना पाच पाच लाख देऊन काही नगरसेवकांना उचलायचं काम चाललेलं आहे. 2014 पासून सर्वांनाच ही सवयी लावली आहे, यामुळे प्रामाणिक निवडणूक होण्याची आणि योग्य माणसाची निवड होण्याची शक्यता नाही, यात मोठमोठे उद्योगपती येतील. उद्योगपती, मोठे कंत्राटदार हे आता विधानसभेमध्ये, विधानपरिषदेमध्ये हेच चेहरे दिसतील म्हणजे सामान्य माणूस कुठेच दिसणार नाही.

आता पंधरा लाख एका नगरसेवकाला दिल्यानंतर हा मोठा उत्सव झालेला आहे. मला वाटतं लोकशाही भविष्यात शिल्लक राहील की नाही हा खरा प्रश्न आहे. शिवानी वडेट्टीवार यांचे नाव चर्चेत असल्याबाबत विचारले असता वडेट्टीवार म्हणाले की, अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.