आजच्या कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय? ‘त्या’ १९ तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीत स्थान मिळणार

मुंबई : राज्यातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये आता १०० टक्के पीक पाहणी आणि पंचनामे करण्याचे आदेश कृषी आयुक्तालयाने दिले आहेत. याशिवाय ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पीक नुकसान होऊनही तांत्रिक निकषांमुळे दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आलेल्या १९ तालुक्यांचा फेरविचार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
कृषी आयुक्त सूरज मंदरे यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या २९ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने पत्र-४ जारी करून हे निर्देश दिले आहेत.

२६५ तालुक्यांमध्ये १०० टक्के पंचनामे
दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेल्या २६५ तालुक्यांमधील प्रत्येक शेतात जाऊन पिकांची पाहणी करून भौतिक आणि डिजिटल स्वरूपात पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक पंचनाम्यावर संबंधित शेतकऱ्याची स्वाक्षरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच पंचनाम्याची प्रत ग्रामपंचायत आणि तालुका पंचायत समिती स्तरावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


केंद्राच्या पथकाकडून पाहणी केली जाण्याची शक्यता असल्याने हे पंचनामे महत्त्वाचे ठरणार आहेत.
१९ तालुक्यांचा दुष्काळ यादीत समावेश होणार?
२५ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार ज्या तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पीक नुकसान झाले आहे, मात्र तांत्रिक निकष पूर्ण न झाल्याने त्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाला नाही, अशा १९ तालुक्यांचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या १९ तालुक्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातील मुखेड, अर्धापूर आणि आणखी एका तालुक्याचा समावेश आहे. चंद्रपूरमधील चिमूर, ब्रह्मपुरी, बल्लारपूर; गोंदियातील आमगाव, देवरी, सालेकसा, गोंदिया; वर्ध्यातील कारंजा; भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर; नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड; साताऱ्यातील पाटण; तसेच सांगलीतील शिराळा आणि कडेगाव या तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे.
