RBI चा मास्टरस्ट्रोक! KCC नियमांत मोठे बदल; एका निर्णयामुळे कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा..

मुंबई : शेतकऱ्यांना कर्ज मिळवताना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. जानेवारी 2027 पासून लागू होणाऱ्या नव्या नियमांमुळे कर्ज वितरण, परतफेड आणि वसुलीची प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक होणार आहे.

नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पीक हंगामाचे प्रमाणिकीकरण करण्यात आले असून अल्पकालीन पिकांसाठी 12 महिन्यांचा तर दीर्घकालीन पिकांसाठी 18 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. याच कालावधीच्या आधारे बँका कर्जाचा आढावा घेऊन परतफेडीचे वेळापत्रक ठरवणार आहेत.
RBI ने स्पष्ट केले की, KCC योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती आणि संबंधित कामांसाठी वेळेवर व पुरेसे कर्ज उपलब्ध व्हावे हा या बदलांचा मुख्य उद्देश आहे. तसेच, 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी पूर्वीप्रमाणे कोणतीही हमी किंवा मार्जिन मनीची अट असणार नाही.

याशिवाय, कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वेच्छेने सोन्या-चांदीच्या वस्तू गहाण ठेवल्यास ते तारणमुक्त कर्ज नियमांचे उल्लंघन मानले जाणार नाही, असेही RBI ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे देशभरातील लाखो शेतकऱ्यांना या निर्णयाचा थेट फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
