Instagram वर ‘ती’ भेटली… पण समोर आले बनावट पोलीस! प्रेमाच्या आमिषातून लाखोंच्या खंडणीचा सापळा; हनीट्रॅप रॅकेटचा मोठा भांडाफोड

मेरठ : Instagram वर अनोळखी मुलीच्या नावाने आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर एका तरुणाचे आयुष्यच संकटात आले. प्रेमाच्या नावाखाली विश्वास संपादन करून प्रत्यक्ष भेटीसाठी बोलावणे, त्यानंतर बनावट पोलीस बनून ब्लॅकमेल करणे आणि लाखो रुपयांची खंडणी उकळणे, असा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणात मेरठ पोलिसांनी मोठी कारवाई करत राहुल पाल आणि आकाश या दोन आरोपींना अटक केली असून, टोळीतील इतर सदस्यांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात नीरज पाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर करण्यात आली. काही दिवसांपूर्वी नीरज यांना Instagram वर एका तरुणीच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली. संवाद वाढत गेला, मैत्री अधिक घट्ट झाली आणि अखेर त्या तरुणीने भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मात्र नीरज यांच्यासमोर मुलगी नव्हती, तर आधीपासून दबा धरून बसलेली आरोपींची टोळी होती.

आरोपींनी स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगत नीरज यांच्यावर एका कथित अश्लील प्रकरणात अडकल्याचा आरोप केला. त्यांना बनावट FIR दाखवण्यात आली. अटक, गुन्हा आणि बदनामीची भीती दाखवत तब्बल दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. भीतीच्या वातावरणात आरोपींनी नीरज यांच्या खात्यातून १० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. मात्र, सततच्या पैशांच्या मागणीमुळे संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.


वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर विशेष तपास पथक तयार करण्यात आले. मोबाईल लोकेशन, डिजिटल व्यवहार आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत राहुल पाल आणि आकाश या दोघांना अटक केली. चौकशीत आरोपींनी या संपूर्ण रॅकेटची माहिती दिली.
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पाच जणांची ही टोळी Instagram वर आकर्षक मुलींची बनावट प्रोफाइल तयार करत असे. त्यानंतर तरुणांशी सातत्याने संवाद साधून त्यांचा विश्वास जिंकला जात असे. योग्य वेळ साधून त्यांना एका कार्यालयात भेटीसाठी बोलावले जाई. तेथे पोहोचल्यानंतर पीडिताला व्हिडिओ काढण्याची, सोशल मीडियावर बदनामी करण्याची किंवा गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असे. आरोपी कधी पोलीस अधिकारी, तर कधी पत्रकार असल्याचे सांगून दबाव निर्माण करत आणि मोठ्या रकमेची मागणी करत असत.
या प्रकरणात सोशल मीडियावर आरोपी बनावट पोलीस चौकी चालवत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, एसपी सिटी विनायक गोपाळ भोसले यांनी हा दावा फेटाळून लावत संबंधित ठिकाणी कोणतीही बनावट पोलीस चौकी नव्हती, तर केवळ कार्यालयाचा वापर केला जात असल्याचे स्पष्ट केले. मात्र, हे कार्यालय हनीट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगच्या कारवायांचे केंद्र बनल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून विना नंबर प्लेटची कार, अतिरिक्त नंबर प्लेट, दोन मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब्लेट, टेलिफोन, वॉकी-टॉकी, फोनपे रिसिव्हर बॉक्स, बीट बुक, शिक्के, नेम प्लेट, विविध अर्ज, फाइल्स आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. या वस्तूंचा वापर करून आरोपी सरकारी यंत्रणेचा आभास निर्माण करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या टोळीतील आणखी दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. Instagram च्या माध्यमातून या टोळीने आतापर्यंत किती जणांना लक्ष्य केले, किती कोटींची किंवा लाखोंची खंडणी उकळली आणि या रॅकेटचे धागेदोरे इतर राज्यांपर्यंत पोहोचले आहेत का, याचा तपास सुरू आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट, व्हिडिओ कॉल आणि प्रत्यक्ष भेटीच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन मेरठ पोलिसांनी नागरिकांना केले आहे.