लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जूनचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकरेंची माहिती…

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
तसेच या योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत योजनेतील लाभार्थी महिला वाट पाहत होत्या. निधीची कमतरता असल्यामुळे जूनचा हप्ता देण्यास काहीसा विलंब झाला. अखेर पात्र महिलांना जून महिन्याचे अनुदान देण्यासाठी अनुसूचित जाती घटकांसाठी असलेला ४१० कोटी ३० लाख रुपये इतका निधी वळविण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली होती.
यासंबंधीचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला होता. यानंतर आता जूनच्या अनुदानाबाबत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे.
महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे’, अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी पोस्टमध्ये दिली आहे.