Jayashree Thorat : बाळासाहेब थोरातांच्या कन्येबाबत आक्षेपार्ह विधान भोवले, वसंत देशमुखांवर अखेर गुन्हा दाखल…

Jayashree Thorat : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर मतदारसंघातील धांदरफळ येथे भाजपने युवा संकल्प सभा आयोजित केली होती. यात बोलताना भाजपनेते वसंतराव देशमुख यांनी आपल्या भाषणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर टीका केली. या प्रकरणी पहाटे वसंत देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
काल नगरमधील संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत भाजपच्या वसंतराव देशमुख या वक्त्याने बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले.
भाजप नेते वसंतराव देशमुख यांच्या विधानाचा सर्वच स्तरांतून निषेध केला जात आहे. जयश्री थोरात यांनी रात्रभर पोलिस स्टेशनबाहेर बसून देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पहाटे वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या काळात तालुक्यातील काही गावांमध्ये गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. Jayashree Thorat
दरम्यान, भाजपचे नेते सुजय विखे यांच्या ताफ्यातील काही गाड्याही अडवण्यात आल्या होत्या. याबाबत बोलताना सुजय विखे यांनी म्हटले की, अशाप्रकारे वक्तव्य करणे चुकीचे आहे. वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो.
पण पोलिसांनी गाड्यांची जाळपोळ करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा. दंगल घडवण्याचे काम कोण करत आहे? हे पोलिसांनी पाहावे. आता पोलिस या प्रकरणावर काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.