राष्ट्रवादीत पुन्हा ‘इनसाईड गेम’ सुरू? तटकरे-पटेलांच्या पदांचा उल्लेख गायब; पक्षात दबक्या आवाजात चर्चा


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शांतता दिसत असली तरी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आता उघडपणे रंगू लागली आहे. कारण, निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेल्या एका पत्राने पक्षात नव्या वादाला तोंड फोडलं आहे. पक्षातील दोन प्रभावशाली नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या पदांचाच उल्लेख राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत नसल्याने राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय? असा सवाल आता राजकीय वर्तुळात जोर धरू लागला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नसल्याने “ही चूक की संकेत?” अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.

२९ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आले होते. या पत्रात विविध पदाधिकाऱ्यांची नावे आणि जबाबदाऱ्या नमूद करण्यात आल्या. मात्र, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून ओळख असलेल्या सुनील तटकरे यांच्या नावासमोर फक्त लोकसभेचे गटनेते एवढाच उल्लेख करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रफुल पटेल यांच्या नावासमोर राष्ट्रीय कार्याध्यक्ष हे पद गायब असून केवळ राज्यसभेचे गटनेते अशी नोंद करण्यात आली आहे.

या प्रकारामुळे पक्षात पुन्हा अंतर्गत संघर्षाच्या चर्चांना उधाण आले आहे. कारण, पक्षातील दोन मोठ्या नेत्यांच्या बाबतीत सलग दुसऱ्यांदा अशी “तांत्रिक चूक” होणं अनेकांना संशयास्पद वाटत आहे. याआधीही अशाच प्रकारे पदांचा उल्लेख राहून गेल्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी “लवकरच दुरुस्ती केली जाईल” असं सांगितलं होतं. मात्र, अनेक दिवस उलटल्यानंतरही संबंधित पत्रात बदल करण्यात आलेला नसल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, याच पत्रात पार्थ पवार आणि जय पवार यांच्या नावांचा सरचिटणीस म्हणून स्पष्ट उल्लेख करण्यात आल्याने चर्चांना आणखी खतपाणी मिळालं आहे. पक्षात नव्या चेहऱ्यांना पुढे आणण्याची तयारी सुरू आहे का? तटकरे आणि पटेल यांना जाणीवपूर्वक बाजूला केलं जात आहे का? असे प्रश्न आता उघडपणे विचारले जात आहेत.

राजकीय विश्लेषकांच्या मते, लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत संघटनात्मक बदलांचे वारे वाहू लागले आहेत. पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांच्या भूमिकांमध्ये बदल होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. दुसरीकडे, पक्षाकडून मात्र हा सगळा प्रकार “कार्यालयीन त्रुटी” असल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र, सलग दुसऱ्यांदा त्याच नेत्यांच्या बाबतीतच गोंधळ झाल्याने कार्यकर्त्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता पक्षाकडून अधिकृत स्पष्टीकरण येतं की या मागे मोठं राजकीय गणित दडलं आहे, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!