शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे कधी मिळणार? कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी सांगितली नवी डेडलाईन; कारणही स्पष्ट


मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जात आहे. मात्र, अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नसल्याने बळीराजाची चिंता कायम आहे.

अशातच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीबाबत मोठी माहिती दिली आहे. पुढील दोन ते चार दिवसांत तब्बल ५ ते १० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, अशी माहिती भरणे यांनी दिली. ते वाशिम येथे पत्रकारांशी बोलत होते.

याद्यांची पडताळणी सुरू

अ‍ॅग्रीस्टॅकच्या माध्यमातून कर्जमाफीच्या लाभार्थी याद्यांची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. शासनाकडे निधी उपलब्ध असून, याद्या अद्ययावत होत जातील तसतशी शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री भरणे यांनी दिली.

या कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांना ४० हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरी भागातील शेतकऱ्यांनाही योजनांचा लाभ

शहरी भागातील शेतकऱ्यांना सिंचन विहीर आणि इतर कृषी योजनांचा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा पत्रकारांनी भरणे यांच्या निदर्शनास आणून दिला. याबाबत आपल्याला माहिती नसल्याची कबुली देत, लवकरच शहरी भागातील शेतकऱ्यांनाही सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक तरतूद केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

२ लाख ३१ हजार शेतकऱ्यांना मोठा फायदा

दरम्यान, सातबारा उताऱ्यावर किंवा इतर अधिकारांमध्ये नाव नसलेल्या शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.

या निर्णयामुळे राज्यातील तब्बल २ लाख ३१ हजार शेतकऱ्यांचा अ‍ॅग्रीस्टॅक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे त्यांना कर्जमाफीसह इतर सरकारी योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे. याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!