मोठी गुड न्यूज! लाडक्या बहिणींच्या खात्यात आनंदाची ‘डबल एन्ट्री’ – 2 दिवसांत 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात

लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, याआधीच मार्च महिन्याचे 1500 रुपयेही लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात आले होते. त्यामुळे अनेक महिलांना अवघ्या दोन दिवसांत थेट 3000 रुपयांचा दुहेरी लाभ मिळाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्य सरकारकडून 14 आणि 15 मे रोजी अनुक्रमे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते वितरित करण्यात आले. काही लाभार्थी महिलांच्या खात्यात मार्चचे पैसे आधीच जमा झाले होते आणि आता एप्रिल महिन्याची रक्कमही टप्प्याटप्प्याने जमा होत असल्याने “डबल गिफ्ट” मिळाल्यासारखी भावना व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत अनेक महिलांनी बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज मिळाल्यानंतर समाधान व्यक्त केले आहे.
ही योजना महायुती सरकारसाठी अत्यंत महत्त्वाची आणि ‘गेमचेंजर’ ठरलेली योजना मानली जाते. जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. योजनेसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत, ज्यामध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच इतर अटींची पूर्तता करणेही बंधनकारक आहे.

दरम्यान, ई-केवायसी प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांची सखोल पडताळणी करण्यात आली असून यामुळे काही महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. सुरुवातीला सुमारे 2.46 कोटी लाभार्थी असलेली संख्या आता 1.76 कोटींवर आली आहे. जवळपास 70 लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण न केल्याने किंवा निकष न जुळल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही.

मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते एकत्र किंवा सलग जमा होत असल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळत आहे. महागाईच्या काळात या योजनेमुळे घरखर्चाला मोठा आधार मिळत असल्याचे लाभार्थींकडून सांगितले जात आहे. अनेक महिला या योजनेमुळे आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, पुढील हप्त्याबाबतही लाभार्थींमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून सरकारकडून नियमितपणे लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ही योजना केवळ आर्थिक मदत नसून महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरत असल्याचेही अधोरेखित केले जात आहे.