मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग; जरांगे पाटलांचा एल्गार, भगवे वादळ धडकणार


मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, अंतरवाली सराटीतून नव्या आंदोलनाची घोषणा करण्याचे संकेत दिले आहेत.

गेल्या काही वर्षांत विविध आंदोलनांच्या माध्यमातून मराठा समाजाचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्यात जरांगे पाटील यांना मोठे यश मिळाले. मात्र, सरकारने दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुढील आंदोलनाची दिशा आणि तारीख निश्चित करण्यासाठी जरांगे पाटील उद्या सकाळी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कुणबी प्रमाणपत्र, हैदराबाद गॅझेट, आंदोलकांवरील गुन्हे आणि शिंदे समितीच्या कामकाजावरून जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. “आठ महिने उलटून गेले तरी प्रमाणपत्रे का दिली नाहीत? सातारा संस्थानचा जीआर एका महिन्यात काढू असे सांगितले होते, तो अद्याप का काढला नाही? आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

तसेच शिंदे समितीची मुदतवाढ करूनही अपेक्षित काम होत नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, आगामी आंदोलनाबाबत जरांगे पाटील काय भूमिका मांडणार आणि मराठा समाजाला कोणते आवाहन करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले. त्यामुळे उद्याच्या पत्रकार परिषदेत ते नेमके काय बोलणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!