वाढदिवसाच्या दिवशीच सगळं संपलं! तुमची आठवण येईल, साताऱ्यात मित्रांच्या स्टेटसने गावं हळहळले…


सातारा : दोन दिवसांपूर्वी साताऱ्यातील आसगाव, मर्ढे आणि खटावमधील आठ जण कोकणातील हर्णे बीच परिसरात पर्यटनासाठी गेले होते. पर्यटनाचा आनंद लुटून परत येताना घात झाला आणि नियतीने त्यांच्यावर घाला घातला. परत येताना स्कार्पिओ गाडी आंबेनळी घाटातील दरीत कोसळून 8 तरूणांचा जागीच अंत झाला.

या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. या भीषण अपघातात मृत्यू झालेले सगळे एकमेकांचे जीवलग मित्र होते. महेश पवार याचा रविवारी वाढदिवस होता. मात्र, वाढदिनीच ‘बर्थे डे’ बॉयसह त्याच्या मित्रांवर नियतीने घाला घातला. आसगावातील बाकीच्या मित्रांना महेशचा वाढदिवस साजरा करायचा होता, पण आधीच ही घटना घडली.

या घटनेनंतर त्यांच्या मित्रांनी डोळ्यात पाणी आणणारा स्टेट्स ठेऊन श्रद्धांजली वाहिली आहे. वाढदिवसाच्या दिवशीच देवाने तुम्हाला आपल्याकडे बोलावून घेतले. ज्या दिवशी आनंद साजरा करायचा होता, त्या दिवशी दुःखाचा डोंगर कोसळला. तुमची खूप आठवण येईल. भावपूर्ण श्रद्धांजली. हे व्हॉट्सॲप स्टेट्स सध्या व्हायरल झाले आहे.

आतापर्यंत दोघांचे मृतदेह हाती लागले असून दोघांचीही ओळख पटली आहे. आणखी सहा मृतदेह दाभिळ गावात खाली जंगलात अडकले आहेत. हे मृतदेह काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने प्रशासन व बचाव पथके काम करत आहेत. अजून घटनास्थळी मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. घटनेने आसगावला आज सकाळपासूनच स्मशानकळा आली आहे.

अपघाताची बातमी कळल्यानंतर अख्खं गाव सुन्न झालं आहे. तरुण मुलांच्या मृत्यूने कुटुंबीयांच्या दु:खाला तर पारावारच उरलेला नाही. गावात सकाळपासूनच स्मशानशांतता पसरली आहे. अपघाताची दुर्दैवी घटना नातेवाईक, मित्र परिवाराला चटका लावणारी आहे. अपघातानंतर दरीतून मृतदेह वर काढण्यासाठी रेस्क्यू टीम प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!