कुख्यात गुंड युवराज काशीद याच्याशी सभापती राम शिंदे यांचा घरोबा? रोहित पवार यांनी फोटो पोस्ट करताच उडाली खळबळ…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय नेत्यांच्या अनेक गुंडांशी असलेले संबंध समोर आले आहेत. यामुळे अनेक नेते अडचणीत आले आहेत. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे.

यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मध्य प्रदेशातील कुख्यात गुंड युवराज काशीद याच्याशी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा कसा घरोबा आहे, ते या फोटोत बघा. या गुंडाच्या पत्नीला स्थानिक निवडणुकीत तिकिट मिळालं नाही म्हणून ‘मी पाठीशी आहे’, असा दिलासा देण्यासाठी की पुढच्या निवडणुकीत नक्की तिकिट मिळेल हे सांगण्यासाठी तर ते गेले नव्हते ना? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच पुण्याच्या गुन्हेगारी वर्तुळातील एका गुंडालाही पासपोर्ट मिळवून देण्यात यांनीच मदत केल्याची जोरदार चर्चा होती. मग सत्ताधाऱ्यांनीच असे गुंड पाळले तर त्यांना कायद्याची भीती कशी राहणार? आणि भीती मेलेले हेच गुंड जेव्हा सामान्य जनतेवर अत्याचार करतात तेंव्हा हेच नेते तिथं सांत्वनासाठी जातात.

तसेच हे पिव्वर ढोंग नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. अशाच ढोंगामुळं माझ्या मतदारसंघातही गुंडगिरी डोकं वर काढायला लागलीय. संवैधानिक पद हे गुंडांना पोसण्यासाठी असतं की कशासाठी, याचं भान जर पदावरील व्यक्तीलाच नसेल तर हे दुर्दैव आहे. असेही रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, आता राम शिंदे यावर काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याबाबत रोहित पवार यांनी काही फोटो देखील पोस्ट केले आहेत. आता आगामी काळात यावरून राजकीय वातावरण पेटणार हे नक्की. याची सध्या कर्जतमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.