“मम्मी… मम्मी…” म्हणत मुलीचा आरडाओरडा; कर्जतमध्ये नराधम बापाचा पोटच्या लेकीवर अत्याचार..


कर्जत : “मम्मी… मम्मी…” असा आरडाओरडा करत १३ वर्षीय मुलीने स्वतःची सुटका करून घेतल्याची संतापजनक घटना रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये उघडकीस आली आहे. स्वतःच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रमेशसिंग परिहार (वय ४५) या नराधम बापाला कर्जत पोलिसांनी अटक केली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत शहरातील मुद्रे परिसरात आरोपी रमेशसिंग परिहार हा आपल्या कुटुंबासह राहत होता. रात्रीच्या वेळी घरातील सर्वजण झोपेत असताना आरोपीने १३ वर्षीय मुलीच्या खोलीत प्रवेश केला. मुलगी गाढ झोपेत असताना तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अचानक घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने प्रतिकार करत आरडाओरडा सुरू केला. मात्र आरोपी रमेशसिंग परिहार याने तिचा आवाज दाबण्यासाठी तोंड दाबण्याचाही प्रयत्न केला. भीतीच्या वातावरणातही मुलीने धैर्य दाखवत “मम्मी… मम्मी…” अशी मोठ्याने हाक मारली.

मुलीचा आवाज ऐकताच तिची आई तातडीने खोलीत पोहोचली. समोर सुरू असलेला प्रकार पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. संतप्त झालेल्या आईने आरोपीला दूर ढकलत मुलीची सुटका केली. पत्नीचा रौद्र अवतार पाहून आरोपीने घरातून पळ काढला.

घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने तात्काळ कर्जत पोलीस ठाणे गाठून पतीविरोधात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत आरोपीचा शोध सुरू केला. गुन्हा घडल्यानंतर दोन दिवस आरोपी पोलिसांना गुंगारा देत फरार होता. मात्र गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे कर्जत पोलिसांनी सापळा रचत अखेर काल रात्री रमेशसिंग परिहार याच्या मुसक्या आवळल्या.

सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेमुळे कर्जतसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून अशा विकृत मानसिकतेच्या आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!