पुणेकरांनो महत्त्वाची बातमी! रिंग रोडला स्वताहून जमीन देणाऱ्यांसाठी मोठा निर्णय, मिळणार जास्त रक्कम

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळापाठोपाठ ‘पीएमआरडीए’ आतील बाजूचा रिंग रोड तयार करणार आहे. यासाठी आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) रिंग रोडसाठीच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.
यासाठी प्रशासनाकडे संयुक्त मोजणी करून भूसंपादन करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच प्रशासनाने दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बैठक घेतली. यामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रिंग रोडसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांतील काही भागांतील जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे.
त्याकरिता स्वेच्छेने जमीन दिल्यास एकूण मोबदल्याच्या २५ टक्के रक्कम जमीनमालकांना जास्त दिली जाणार आहे. तसेच विरोध केल्यास सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामुळे आता जर जमीन दिली तर जास्तीचे पैसे मिळणार आहेत.
यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हा भूसंपादन समन्वयक डॉ. कल्याण पांढरे, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक सूर्यकांत मोरे, ‘पीएमआरडीए’चे सहआयुक्त हिंमत खराडे, अधीक्षक अभियंता अशोक भालकर उपस्थित होते. या बैठकीत एप्रिल महिन्यापर्यंत मोजणी करण्याचे आदेशही दिले आहेत.
दरम्यान, आतील रिंग रोडसाठी लागणाऱ्या जमिनीपैकी बहुतांश जमीन ही अकृषक (एनए) आहे. यामुळे जमीनमालकांनी वेळेत जमीन दिल्यास नागरिकांसह ‘पीएमआरडीए’ला फायदा होणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात कामाला गती मिळणार आहे.
दरम्यान, या रिंग रोडसाठी ७४३.४१ हेक्टर क्षेत्र भूसंपादन करणे अपेक्षित आहे. त्यातील २३.२८ हेक्टर सरकारी आणि ४५.८४ हेक्टर वन जमीन आहे. तसेच ६.२५ हेक्टर क्षेत्र हे संरक्षण खात्याचे आहे. यामुळे लवकरच ही जमीन ताब्यात घेतली जाणार आहे.