तुम्हाला डिजेच्या आवाजाने त्रास होत असल्यास तात्काळ ११२ नंबरवर संपर्क करा – वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे

लोणी काळभोर : मोठ्या आवाजात वाजवल्या जाणाऱ्या डिजेच्या त्रास होत असल्यास तुम्ही तात्काळ ११२ क्रमांकावर संपर्क करा. संपर्क साधल्यानंतर तुम्हाला तात्काळ मदत मिळेल. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता पुढे येथून पोलीस नियंत्रण कक्षाकडे तक्रार करावी. असे आवाहन लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी केले आहे.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह पुणे शहर पोलिसांना दिले आहेत. याचबरोबर गणेशोत्सवानंतर ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन झाले की नाही, याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायाधिकरणाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवाच्या कालावधीत गणेश मंडळांच्या ठिकाणी आवाजाची पातळी मोजली जाणार आहे. त्यासाठी एका पथकाची नेमणूकदेखील करण्यात आलेली आहे.
डीजे अथवा बँड वाजविण्याच्या संदर्भात न्यायालयाने आवाजाच्या संदर्भात डेसिबलच्या मर्यादा दिलेल्या आहेत. त्या नियमांच्या अधीन राहूनच त्यांनी डीजे, बँड वाजवावे. जर कोणी कर्णकर्कश आवाज वाढवून शासकीय नियमाचे उल्लंघन करत असतील तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात येईल. तसेच तक्रार देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सांगितले आहे.

पर्यावरण मंत्रालयाने १६ ऑगस्ट २००० च्या निर्णयानुसार ध्वनिवर्धक वापरण्यावर निर्बंध घातले आहेत. ध्वनिक्षेपकासाठी मर्यादा ठरवली आहे. औद्योगिक क्षेत्र (दिवसा ७५, रात्री ७० डेसिबल), वाणिज्य क्षेत्र (दिवसा ६५, रात्री ५५), निवासी क्षेत्र (दिवसा ५५, रात्री ४५), शांतता झोन (दिवसा ५०, रात्री ४०) अशी मर्यादा आहे. रात्री दहानंतर ध्वनिक्षेपक लावण्यास बंदी आहे. ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा किंवा एक लाख रुपये दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
