शेतकऱ्यांवर सप्टेंबरमध्ये मोठं संकट! 5-10 तारखेनंतर देशभरात पावसाचा ब्रेक? 4 आठवड्यांचा अंदाज आला

पुणे : यंदाच्या मान्सूनमध्ये देशातील अनेक भागात पावसाची स्थिती असमान राहिली आहे. काही भागात पावसाने ओढ दिली, तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. आता मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यात सप्टेंबरमध्ये पावसाची स्थिती कशी राहणार, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
हवामानाच्या मॉडेलनुसार, पुढील दोन आठवड्यांपर्यंत पूर्व आणि पूर्वोत्तर भारतातील अनेक भागात पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

मात्र, 5 ते 10 सप्टेंबरच्या आसपास पावसाच्या स्थितीत बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. या कालावधीनंतर देशातील अनेक भागात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. काही राज्यांमध्ये पावसामधील अंतर वाढू शकतं आणि त्यामुळे मान्सूनची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.


याचा अर्थ संपूर्ण देशातून पाऊस अचानक गायब होईल असा नाही. स्थानिक हवामान प्रणाली तयार झाल्यास काही भागात पाऊस सुरू राहू शकतो. त्यामुळे सध्या तरी देशभर पाऊस पूर्णपणे थांबेल, असं म्हणणं योग्य ठरणार नाही.
पुढील काही आठवड्यांमध्ये हवामानाच्या परिस्थितीत बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये संपूर्ण देशात पाऊस कमी राहील, असा ठाम निष्कर्ष सध्या काढता येणार नाही. मात्र, 5 ते 10 सप्टेंबरनंतर अनेक भागात पावसाचा जोर कमी होण्याचे संकेत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.