३५ वर्षांखालील तरुणांवर भाजपचा मोठा डाव! युवा मोर्चाची २९ जणांची टीम जाहीर; शंभवी साळेंकडे ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी


मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या युवा संघटनेत मोठे फेरबदल करत नव्या दमाची फळी मैदानात उतरवली आहे. भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीतील २९ पदाधिकाऱ्यांची नवी टीम जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्व नियुक्त्यांमध्ये ३५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने संघटनात्मक पातळीवर आखणी केल्याचं स्पष्ट होत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार प्रदेश सरचिटणीस आणि युवा मोर्चाचे प्रभारी सुनील राणे तसेच युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी या नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. राज्यातील कोकण, मुंबई, ठाणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र अशा विविध विभागांतील चेहऱ्यांना या टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे.

या नियुक्त्यांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी जबाबदारी नांदेडच्या २८ वर्षीय शंभवी साळे यांच्याकडे आली आहे. त्यांची युवती प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील युवतींचं संघटन मजबूत करण्यासोबतच तरुणींना पक्षाच्या युवा संघटनेशी जोडण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

उपाध्यक्षपदासाठी रत्नागिरीचे विक्रम जैन, पुण्याचे मयुर दौंडकर, कल्याणचे भावार्थ दौंड, बुलढाण्याचे शुभम जायभाय, छत्रपती संभाजीनगरचे मयुर वंझारी, लातूरचे सौरभ चौहान, वाशिमचे वैभव वायचाळ, वर्ध्याचे अंकुश ठाकुर, देवगडचे श्रेयस शाहकर आणि पुण्याचे सौरभ पुंडलिक यांची निवड झाली आहे.

महामंत्रीपदाची जबाबदारी नागपूरचे बादल राऊत, सोलापूरचे सुदर्शन यादव, पिंपरी-चिंचवडच्या तेजस्विनी दुर्गे आणि बीडचे दत्तप्रसाद जाधव यांच्याकडे देण्यात आली आहे.

सचिवपदासाठी साताऱ्याचे अनीमेश कुलकर्णी, रत्नागिरीचे अद्वैत कुलकर्णी, नागपूर शहरचे अमेय विश्वरूप, जळगावचे राज चव्हाण, जालन्याचे राहुल नरोटे, इगतपुरीचे योगेश चांदवडकर, कोल्हापूरचे जयेश बुगड, मुंबईचे अतुल जैन, रत्नागिरीचे अॅड. मिलिंद नांदगावकर आणि यवतमाळचे अॅड. बाळकृष्ण कायपेलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय मुंबईचे विरेंद्र ठाकुर यांच्याकडे कोषाध्यक्ष, नागपूरचे यश सातपुते यांच्याकडे सहकोषाध्यक्ष, मुंबईचे यश तायडे यांच्याकडे कार्यालय प्रमुख आणि नवी मुंबईचे प्रदीप सकपाळ यांच्याकडे सामाजिक माध्यम प्रमुखपद सोपवण्यात आलं आहे.

या नव्या टीमच्या माध्यमातून तरुणांमध्ये पक्षाची संघटनात्मक पकड वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पक्षाची धोरणं आणि भूमिका तरुणांपर्यंत पोहोचवण्यासोबतच तळागाळातील युवा कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांवर असेल. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही २९ जणांची फळी भाजपसाठी किती प्रभावी ठरते, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. पुढील टप्प्यात जिल्हा आणि तालुका पातळीवरील युवा मोर्चाच्या कार्यकारिण्यांनाही आकार दिला जाण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!