गोकुळच्या एका निर्णयाने दूध बाजारात खळबळ! वारणानेही वाढवले दर, गाय-म्हशीच्या दुधाचे नवे दर जाहीर


कोल्हापूर : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असतानाच सर्वसामान्य ग्राहकांना मात्र महागाईचा आणखी एक धक्का बसणार आहे. गोकुळ आणि वारणा या दोन प्रमुख दूध संघांनी दूध खरेदी आणि विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे गोकुळने आपल्या इतिहासात पहिल्यांदाच विक्री दरात थेट सहा रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे पुणे, मुंबई आणि कोल्हापुरातील ग्राहकांना शनिवारपासून दूध खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. नेमके नवे दर किती असतील, जाणून घ्या…

गोकुळ दूध संघाच्या शिरगाव येथील प्रधान कार्यालयात अध्यक्ष राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत दरवाढीचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर ३ रुपये, तर गायीच्या दूध खरेदी दरात २ रुपये वाढ करण्याचे निश्चित झाले आहे. म्हशीच्या दूध खरेदी दरातील ही मागील दहा वर्षांतील सर्वाधिक वाढ असल्याचे सांगितले जात आहे.

शेतकऱ्यांना आता किती पैसे मिळणार?

६ फॅट आणि ९ एसएनएफ असलेल्या म्हशीच्या दुधासाठी पूर्वी प्रतिलिटर ५५ रुपये मिळत होते. आता सुधारित दर ५८ रुपये असेल. तर ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ असलेल्या गायीच्या दुधाचा खरेदी दर ३७ रुपयांवरून ३९ रुपये करण्यात आला आहे. सुधारित दरपत्रक लवकरच प्राथमिक दूध संस्थांना दिले जाणार आहे.

ग्राहकांसाठी नवे विक्री दर काय?

गोकुळच्या दूध विक्री दरातही मोठी वाढ झाली आहे. पुणे आणि मुंबईमध्ये पूर्वी ७८ रुपये प्रतिलिटर असलेले दूध आता ८४ रुपयांना मिळणार आहे. कोल्हापुरातही प्रतिलिटर ७२ रुपयांऐवजी ७८ रुपये मोजावे लागतील. म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात सहा रुपये, तर गायीच्या दुधाच्या विक्री दरात चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

वारणा संघानेही वाढवले दर!

गोकुळपाठोपाठ वारणा दूध संघानेही दरवाढ जाहीर केली आहे. म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर ६ रुपये आणि गायीच्या दूध विक्री दरात ४ रुपये वाढ करण्यात आली आहे. दूध उत्पादकांसाठी म्हशीच्या दूध खरेदी दरात ३ रुपये, तर गायीच्या दूध खरेदी दरात २ रुपये वाढ करण्यात आली आहे. वारणा संघाची ही दरवाढ शनिवारच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

दरवाढीमागे नेमके कारण काय?

गोकुळशी संलग्न असलेल्या सुमारे ८ हजार २०० प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून दररोज १७ ते १८ लाख लिटर दूध संकलित होते. साडेपाच लाख शेतकरी या संघाला दूध पुरवठा करतात. गेल्या वर्षभरात दूध उत्पादकांच्या खरेदी दरात वाढ झाली; मात्र विक्री दरात त्या तुलनेत वाढ झाली नव्हती. पशुखाद्याच्या कच्च्या मालाचे वाढलेले दर, दूध संकलनातील घट आणि प्रशासकीय काळात झालेला कोट्यवधींचा तोटा यामुळे विक्री दर वाढवण्याची गरज निर्माण झाल्याची चर्चा आहे. तोटा भरून निघाल्यानंतर विक्री दराचा पुन्हा आढावा घेतला जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

बाजारपेठेतील परिस्थिती, दुग्धजन्य पदार्थांची मागणी, कच्च्या मालाच्या किमती आणि इंधन दरातील वाढ लक्षात घेऊन दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य दिल्याचे गोकुळचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी सांगितले. तर जनावरांचे संगोपन, पशुखाद्य आणि पशुवैद्यकीय सेवांचा वाढता खर्च विचारात घेऊन खरेदी दर वाढवल्याचे वारणा समूहाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी स्पष्ट केले.

एकीकडे शेतकऱ्यांच्या हातात अधिक पैसे येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तर दुसरीकडे दूध खरेदीसाठी ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. त्यामुळे या दरवाढीचा परिणाम आता घराघरातील दूध खर्चावर दिसणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!