लोणी काळभोरमध्ये १६ वर्षीय मुलाच्या भरधाव दुचाकीची ८२ वर्षीय वृद्धेला धडक; गंभीर जखमी, पायाला अन् गुडघ्याला फ्रॅक्चर


लोणी काळभोर :  येथील भाजीमंडईसमोर रस्ता ओलांडणाऱ्या ८२ वर्षीय वृद्ध महिलेला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवारी (ता. १९) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात गयुबाई बाबुराव कांबळे (वय ८२, रा. बौद्धवस्ती, लोणी काळभोर) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

त्यांच्या उजव्या पायाच्या नडगीला, गुडघ्याला आणि बरगडीला दुखापत झाली असून, त्यांना फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यावर विश्वराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, अपघातावेळी दुचाकी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी स्नेहल हरीश्चंद्र कांबळे (वय ३०) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधित अल्पवयीन दुचाकीस्वाराविरोधात मोटार वाहन अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गयुबाई कांबळे या लोणी काळभोर भाजीमंडईमध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. गुरुवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे भाजी विक्रीसाठी मंडईत गेल्या होत्या. दुपारी अडीचच्या सुमारास लघुशंकेसाठी जाण्याकरिता त्या भाजीमंडईसमोरील लोणी फाटा ते लोणी गावाकडे जाणारा रस्ता ओलांडत होत्या. त्याचवेळी लोणी गावाच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे त्या रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्या.

अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या नातवंडांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर खासगी रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने विश्वराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, दुचाकीस्वाराच्या नातेवाइकांनी रुग्णालयात येऊन उपचारांचा खर्च करण्याची तयारी दर्शवित पोलिसांत तक्रार देऊ नये, अशी विनंती केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

संबंधित दुचाकीचा क्रमांक एमएच १२ आरएच ४३२६ असून, ती १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा चालवत होता. अपघातानंतर जखमी वृद्धेला मदत न करता दुचाकीस्वार घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!