पुण्यातील एअर हॉस्टेस वर्षा तुरकर हत्या प्रकरणाचा थरारक उलगडा; पतीच्या मैत्रिणीच्या हत्येसाठी पत्नीने दिली १३ लाखांची सुपारी, चौघांना अटक


पुणे : बोंडरानी जंगलात पाच दिवसांपूर्वी झालेल्या एअर हॉस्टेस वर्षा तुरकर हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पतीच्या विवाहबाह्य मैत्रीला कंटाळून पत्नीनेच पतीच्या मैत्रिणीच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या हत्येसाठी १३ लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि तब्बल २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे या प्रकरणाचा उलगडा केला. या कारवाईत मुख्य सूत्रधार पत्नीसह चौघांना अटक करण्यात आली आहे. इमरान करीम शेख, शाहरुख खान पठाण, कुणाल कुंभलकर आणि मोना नितेश अग्रवाल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर नलेन शेख आणि क्रिश राऊत हे दोघे अद्याप फरार आहेत.

तपासादरम्यान मोना हिला छत्तीसगडमधील एका व्यक्तीकडून १३ लाख रुपये मिळाल्याची माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे.

पतीच्या कारच्या जीपीएसवरून आखला कट

पोलिसांच्या तपासानुसार, नितेश अग्रवाल आणि वर्षा यांच्यातील वाढत्या मैत्रीमुळे नितेशची पत्नी मोना अग्रवाल (वय ४१) नाराज होती. याच कारणातून तिने शेजारी राहणाऱ्या कुणाल कुंभलकर (वय ३१) याच्या मदतीने वर्षाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

त्यानुसार, कुणालने शाहरुख पठाण याच्याशी संपर्क साधला. शाहरुखने पुढे इमरान शेख, नलेन ऊर्फ नायलान शेख आणि क्रिश राऊत यांच्यावर हत्येची जबाबदारी सोपवल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे नितेश वापरत असलेली कार त्याची पत्नी मोना हिच्या नावावर होती. मोनाने या कारच्या ‘टोयोटा आय-कनेक्ट’ जीपीएस ॲपचा आयडी आणि पासवर्ड आरोपींच्या मोबाईलमध्ये लॉग-इन करून दिल्याचा आरोप आहे. या जीपीएस लोकेशनच्या आधारे आरोपींनी वर्षाचा माग काढला आणि बोंडरानी जंगलात तिची हत्या केली.

पुण्यातील धानोरी परिसरात राहत होती वर्षा

मृत एअर हॉस्टेसचे नाव वर्षा धुरनलाल तुरकर (वय ३५) असे आहे. ती पुण्यातील धानोरी परिसरात राहत होती. मूळची मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किन्ही गावची असलेली वर्षा पुणे विमानतळावर एअर इंडियामध्ये कार्यरत होती.

या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपासातून या कटातील आर्थिक व्यवहार आणि इतर बाबींचा अधिक उलगडा होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!