आधी शीतपेय पाजलं, मग लॉजवर नेलं… २० वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर नराधमांचा बलात्कार


सांगली : सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर परिसरात २० वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीमुळे खळबळ उडाली आहे. शीतपेयातून गुंगीचं औषध देऊन आपल्याला लॉजवर नेण्यात आलं आणि त्यानंतर दोघांनी इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या तक्रारीनंतर ईश्वरपूर पोलिसांनी सामूहिक बलात्कारासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून एका संशयिताला अटक केली आहे.

पीडित तरुणी मूळची सातारा जिल्ह्यातील असून, शिक्षणासाठी सध्या ईश्वरपूर येथे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तक्रारीनुसार, संशयितांनी तिला ईश्वरपूर-कामेरी रस्त्यावरील एका लॉजवर नेलं. तेथे शीतपेयातून तिला गुंगीचं औषध पाजल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करण्यात आल्याचं तिने पोलिसांना सांगितलं.

इतकंच नाही, तर हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि मारहाणही करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे. घटनेनंतर तिने ईश्वरपूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या प्रकरणात शार्दुल पाटील (वय २१, रा. रेठरेधरण, ता. वाळवा) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरा संशयित प्रथम पाटील फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे. घटनेची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, यासह प्रकरणातील इतर बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, लातूरमध्येही महाविद्यालयातून घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. तरुणी मैत्रिणीसोबत जात असताना रोहित पोहरे याने तिला रस्त्यात अडवलं. ‘मला तुझ्यासोबत बोलायचं आहे, तू मला का बोलत नाहीस?’ अशी विचारणा केल्यानंतर त्याने खंजिराने तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.

या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. घटनास्थळी नागरिकांनी हस्तक्षेप करून तिला खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर जमावाने आरोपी रोहित पोहरेला पकडून मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. तरुणीची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सांगलीतील अत्याचाराच्या तक्रारीनंतर पोलिस तपासाला वेग आला असून, या प्रकरणातील फरार संशयिताचा शोध आणि घटनेशी संबंधित इतर पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!