घरात घुसून आधी नवरा-बायकोला संपवलं, नंतर मृतदेहासोबत केलं भयंकर कृत्य; आरोपीच्या कबुलीने खळबळ!


उत्तर प्रदेश : चोरी करण्यासाठी घरात शिरलेल्या एका तरुणाने पती-पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात घडली आहे. मात्र, या प्रकरणात हत्येपेक्षाही संतापजनक बाब तपासादरम्यान समोर आली. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीने तिच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दाम्पत्याची अवघ्या दोन वर्षांची मुलगीही या हल्ल्यात जखमी झाली. ४ आणि ५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

रेल्वे स्थानकापासून सुरू झाला चोरीचा कट

गुरसहायगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुन्या सरकारी निवासस्थानात संजीव नावाचे रेल्वे तिकीट विक्रेते पत्नी आणि मुलीसह राहत होते. योगेश राजपूत उर्फ पंगा हा आरोपी रेल्वे स्थानक परिसरात फिरत असे. संजीव यांना तिकीट विक्रीतून मिळालेले पैसे घेऊन जाताना त्याने अनेकदा पाहिले होते. याच पैशांवर डोळा ठेवून त्याने घरात चोरी करण्याचे ठरवले. पोलीस अधीक्षक विनोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीच्या उद्देशानेच आरोपी घरात घुसला होता.

पतीला जाग आली अन् काही क्षणांतच घडलं भयंकर कृत्य

घरात शिरल्यानंतर संजीव यांना जाग आली. त्यामुळे आरोपीने काठीने त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली. पतीवर झालेला हल्ला पाहून पत्नीने आरडाओरड सुरू केली. मात्र, आरोपीने तिचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर तिच्याच स्कार्फने गळा आवळून तिचाही जीव घेतला. या हल्ल्यात त्यांची दोन वर्षांची मुलगी तान्या जखमी झाली.

पाच हजार रुपये चोरले, एटीएम कार्डही नेले

पोलिसांच्या दाव्यानुसार, महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीने तिच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचार केला. चौकशीदरम्यान योगेशने याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याने घरातील पर्समधून सुमारे पाच हजार रुपये आणि संजीव यांचे एटीएम कार्ड घेतले व घटनास्थळावरून पळ काढला.

कसारी जंगलात पोलिसांना पाहताच गोळीबार

दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच पोलीस आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने घटनास्थळावरील पुरावे गोळा केले. सीसीटीव्ही चित्रफिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याचा शोध सुरू करण्यात आला. अखेर कसारी जंगलाजवळ पोलिसांनी त्याला घेरले. मात्र, पकडले जाण्याच्या भीतीने योगेशने पोलीस पथकावर गोळीबार केला.

स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल गोळीबारात आरोपीच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या. जखमी अवस्थेत त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक बेकायदेशीर पिस्तूल आणि काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून, दोन निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!