झाडाखाली बसला होता, पोलिसांना पाहताच पळू लागला! सहा महिन्यांसाठी तडीपार गणेश विरकरचा लोणी काळभोरमध्ये नेमका काय घडला?

लोणी काळभोर : सहा महिन्यांसाठी तडीपार केलेले असतानाही गावात परतून बिनधास्त वावरणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा अखेर पोलिसांनी डाव उधळला. शेतातील झाडाखाली बसलेल्या या गुन्हेगाराला पोलिसांनी पाहताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करत काही अंतरावरच त्याला पकडले. बुधवारी (१८ नोव्हेंबर) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास विरकर वस्ती परिसरात ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
गणेश बाळासाहेब विरकर (वय ४०, रा. विरकर वस्ती, रामदार रोड, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून त्याला सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, या आदेशाचे पालन न करता त्याने पुन्हा परिसरात प्रवेश केला होता.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार सचिन सोनवणे हे अशोक गिरी आणि गणेश खरात यांच्यासोबत बुधवारी हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी विरकर वस्तीमध्ये तडीपार केलेला सराईत गुन्हेगार आल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संबंधित ठिकाणी कारवाईसाठी धाव घेतली.

पोलिसांनी परिसरात शोध घेतला असता गणेश विरकर एका शेतातील झाडाखाली बसलेला दिसला. पोलिसांची नजर पडताच त्याने तेथून निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क असलेल्या पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि काही अंतरावरच त्याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान, पुणे शहर पोलीस सहआयुक्तांच्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार तसेच परिमंडळ सहाच्या पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार १ जून २०२६ पासून त्याला सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, तडीपारीच्या काळात पुणे जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी त्याने कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नव्हती.
तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गणेश विरकर याच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १३५, १४२, ३७ (१) (ब) आणि ३७ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पथकातील पोलीस अंमलदार सचिन सोनवणे यांनी सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.
