16 वर्षांचा विद्यार्थी, 38 वर्षांची ट्यूशन टीचर; फोनवर तासन्तास बोलायचे, अचानक दोघेही बेपत्ता


आग्रा : ट्यूशनला जाणारा 16 वर्षांचा विद्यार्थी आणि त्याला शिकवणारी 38 वर्षीय शिक्षिका एकाच वेळी बेपत्ता झाल्याने आग्रा परिसरात खळबळ उडाली होती. 4 ऑगस्ट रोजी घरातून बाहेर पडल्यानंतर विद्यार्थी घरी परतला नाही. त्याचवेळी त्याची ट्यूशन शिक्षिकाही बेपत्ता असल्याचं समोर आलं. यानंतर दोन्ही कुटुंबांनी पोलिसांत धाव घेतली.

हे प्रकरण आग्रा येथील ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. 16 वर्षीय विद्यार्थी एका पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता 11वीत शिकतो. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अभ्यासावरून तो नाराज होता. 4 ऑगस्ट रोजी शाळेच्या प्रोजेक्टचं काम असल्याचं सांगून तो घराबाहेर पडला. त्याने आपली सायकल एका मित्राच्या घरी ठेवली आणि त्यानंतर त्याचा ठावठिकाणा लागला नाही.

कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्र आणि परिचितांकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. विद्यार्थ्याच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच त्याला ट्यूशन शिकवणारी 38 वर्षीय शिक्षिकाही घरातून बेपत्ता असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. शिक्षिका विवाहित असून तिला दोन मुलं आहेत.

तपासादरम्यान पोलिसांनी दोघांच्या मोबाईल क्रमांकांची कॉल डिटेल्स तपासली. त्यातून दोघांमध्ये नियमित संपर्क असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी रेल्वे स्थानकांसह विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.

आग्रा कॅन्ट रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघेही ट्रेनमध्ये बसताना दिसले. या महत्त्वाच्या धाग्याच्या आधारे पोलिसांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांचा शोध सुरू केला.

अखेर पोलिसांनी 16 वर्षीय विद्यार्थ्याला नोएडा येथून, तर शिक्षिकेला मथुरा येथून शोधून काढलं. दोघांनाही सुरक्षितपणे ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आलं.

चौकशीदरम्यान शिक्षिकेने विद्यार्थ्याच्या कौटुंबिक परिस्थितीबाबत माहिती दिली. अभ्यासावरून घरात वारंवार ओरडा होत असल्याने तो मानसिकदृष्ट्या त्रस्त असल्याचं तिने सांगितलं. विद्यार्थ्याने फोन केल्यानंतर त्याची सुरक्षितता लक्षात घेऊन त्याच्यासोबत गेल्याचा दावा शिक्षिकेने पोलिसांसमोर केला.

पोलिसांनी दोघांचेही जबाब नोंदवले असून, या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे. कुटुंबीयांनी सध्या पुढील कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!