वाटाणा शिजत नाही म्हणून आवाज उठवला, पण कारवाई सेविकेवरच! अंगणवाडीतील पोषण आहारावरून मोठा वाद

पुणे : आंबेगाव तालुक्यातील नंबरवाडी येथील अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवरच कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कार्यालयीन शिस्तीचा भंग, वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन आणि सोशल मीडियासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्याचा ठपका सेविकेवर ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांनी पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत व्हिडिओच्या माध्यमातून तक्रार मांडली होती. विशेषतः आहारातील वाटाणा व्यवस्थित शिजत नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. वाटाणा आधी पाण्यात भिजवून ठेवूनही कुकरमध्ये अनेक शिट्ट्या झाल्यानंतर तो व्यवस्थित शिजत नसल्याचे त्यांनी सांगितले होते.

या प्रकारामुळे बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही बालकांना हा आहार खाण्यात अडचण येत असल्याचे, तसेच पोटदुखीच्या तक्रारी होत असल्याचेही सेविकांकडून सांगण्यात आले आहे. लापशीचा भरडा आणि वाटाणा यांसारख्या पदार्थांच्या गुणवत्तेबाबतही तक्रारी करण्यात आल्या आहेत.


तक्रार करणाऱ्या सेविकेवरच कारवाई
पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आवाज उठवल्यानंतर रेश्मा पारधी यांच्यावर कार्यालयीन शिस्तीचा भंग आणि सोशल मीडिया वापराबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यांना मानधनी पदावरील सेवेतून कायमस्वरूपी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
यामुळे आता प्रशासनाच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. सोशल मीडियाच्या वापराबाबत नियमांचे उल्लंघन झाले असल्यास त्यावर कारवाई होऊ शकते; मात्र सेविकेने उपस्थित केलेल्या पोषण आहाराच्या गुणवत्तेच्या प्रश्नाचीही स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
आहाराची गुणवत्ता तपासणार कोण?
तीन ते सहा वर्षांच्या बालकांसह गरोदर आणि स्तनदा मातांना पूरक पोषण आहार देण्याचा उद्देश कुपोषण रोखणे आणि आरोग्य सुधारणे हा आहे. त्यामुळे या आहाराच्या गुणवत्तेबाबत तक्रार समोर आल्यास संबंधित आहाराचे नमुने तपासणे, गुणवत्ता अहवाल पडताळणे आणि पुरवठादाराची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे या प्रकरणाची दखल घेण्याची आणि संबंधित अन्नाची गुणवत्ता तपासण्याची मागणी केली आहे.
आता प्रशासनाकडून या पोषण आहाराचे नमुने तपासले जातात का, पुरवठादारावर काही कारवाई होते का आणि सेविकेवर करण्यात आलेल्या कारवाईचा नेमका आधार काय आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.