रेशनमध्ये तुमच्या हक्काच्या धान्यावर कुणी डल्ला मारला तर लगेच कळणार! मोबाईलवर येणार ‘तो’ महत्त्वाचा मेसेज; नंबर अपडेट करण्याची सोपी प्रक्रिया

पुणे : रेशन दुकानातून मिळणारे धान्य आपल्या कुटुंबाच्या हक्काचे असते. मात्र, काही कारणाने आपल्या शिधापत्रिकेवरील धान्य दुसऱ्याने उचलले तर काय? आता अशा प्रकारची माहितीही लाभार्थ्यांना मोबाईलवर मिळू शकते. यासाठी शिधापत्रिकेला आधारकार्ड आणि मोबाईल क्रमांक जोडणे (सीडिंग) आवश्यक आहे.
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत किंवा शासनाच्या नियमानुसार धान्याचा लाभ दिला जातो. सध्या रेशनचे वितरण ई-पॉस मशिनद्वारे केले जाते. धान्य घेताना लाभार्थ्याच्या अंगठ्याचा ठसा घेऊन पडताळणी केली जाते. काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास ओटीपीच्या माध्यमातूनही धान्याची उचल करता येते. मात्र, यासाठी शिधापत्रिकेशी मोबाईल क्रमांक संलग्न असणे गरजेचे आहे.

रेशन घेतल्यावर मोबाईलवर येणार एसएमएस


तुमच्या शिधापत्रिकेवरील धान्य रेशन दुकानात उपलब्ध झाल्याची माहिती मिळण्यासोबतच धान्याची उचल झाल्यानंतरही मोबाईलवर संदेश मिळू शकतो. त्यामुळे आपल्या कार्डावर किती धान्य आले, त्याची उचल झाली का, याबाबत माहिती ठेवणे सोपे होते. विशेष म्हणजे, आपल्या परवानगीशिवाय किंवा आपल्या माहितीत नसताना धान्याची उचल झाल्यास त्याची माहितीही एसएमएसच्या माध्यमातून समजू शकते.
मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी काय कराल?
शिधापत्रिकेला मोबाईल क्रमांक जोडण्यासाठी किंवा आधीचा क्रमांक अपडेट करण्यासाठी लाभार्थ्यांनी आपल्या गावातील संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराशी संपर्क साधावा. तसेच तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाशी संपर्क करून मोबाईल क्रमांक जोडणीसाठी आवश्यक अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता येते. यासाठी आधारकार्डासह आवश्यक कागदपत्रांची माहिती संबंधित कार्यालय किंवा दुकानदाराकडून घ्यावी.
मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी पैसे लागतात का?
महत्त्वाची बाब म्हणजे मोबाईल क्रमांक अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे कार्डधारकांनी आपल्या रेशन दुकानदाराकडे जाऊन मोबाईल क्रमांक शिधापत्रिकेशी संलग्न करून घ्यावा.
रेशन दुकानदारांविरोधात ग्राहकांकडून विविध तक्रारी येत असतात. धान्य वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ई-पॉस प्रणालीचा वापर केला जात आहे. मोबाईल क्रमांक आणि आधार जोडणीमुळे रेशनच्या व्यवहाराची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या रेशनचा व्यवहार तुमच्या नजरेसमोर राहावा, यासाठी मोबाईल नंबर अपडेट करून घेणे महत्त्वाचे आहे.
