पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी, २१९ जागांसाठी तब्बल १८०६ जणांचे २३३५ अर्ज दाखल…

पुणे : महापालिका निवडणुकीनंतर आता राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर यंदा होत असलेल्या पुणे जिल्हा परिषद व जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१९ जागांसाठी १८०६ जणांनी तब्बल २३३५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

तसेच पुणे जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवारी अर्ज इंदापूर तर, सर्वात कमी अर्ज वेल्हे तालुक्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, गुरुवारी (दि.२२ जानेवारी) सकाळी ११ वाजल्यापासून उमेदवारी अर्जांची छाननी करण्यास सुरुवात झाली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ आणि पंचायत समित्यांच्या १४६ मिळून २१९ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास दि. १६ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. काल (बुधवार) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.
पहिल्या तीन दिवसात अवघ्या ५८ इच्छुकांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यानंतरच्या तीन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास इच्छुकांची मोठी झुंबड उडाली होती. दाखल झालेल्या एकूण उमेदवारी अर्जांमध्ये जिल्हा परिषदेच्या ७३ जागांसाठीच्या ८५३ तर, जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या १४६ जागांसाठीच्या १४८२ अर्जांचा समावेश आहे.

जिल्हा परिषद गटांसाठी ६४१ जणांनी ८५३ तर पंचायत समित्यांच्या गणांसाठी ११६५ जणांनी १४८२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा परिषद गटांसाठी ३७४ पुरुष तर, २६७ महिलांनी तर, पंचायत समित्यांसाठी ६४४ पुरूष आणि ५२१ महिलांनी उमेदवारी अर्ज केले असल्याचे जिल्हा परिषद निवडणूक जिल्हा समन्वयक व रोजगार हमी योजना विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते यांनी सांगितले.
