वय जास्त असूनही मुलीला लग्नासाठी मागणी घातलीच कशी? पुण्यात लग्नाची मागणी घालणाऱ्या कामगाराला संपवलं, उडाली खळबळ…

पुणे : पुण्यातून एक धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीला वय जास्त असूनही मुलीला लग्नाची मागणी घातलीच कशी? असा प्रश्न विचारत बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही मारहाण इतकी भयंकर होती की, उपचारादरम्यान पीडित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

दिलीप अलकुंटे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, पीडित व्यक्ती दिलीप अलकुंटे एका गॅरेजवर काम करत होता. तर आरोपी रामजी राठोड हे बिगारी कामगार आहेत. दिलीप याने रामजी राठोड याच्याकडे त्यांच्या मुलीशी लग्न करायचे असल्याची इच्छा व्यक्त केली.

त्या वेळी रामजी यांचा राग अनावर झाला. रामजी याने ‘तुझे वय काय, आमच्या मुलीचे वय काय,’ असे म्हणत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाण करताना रामजीसोबत आणखी ३ जण होते. ‘याला आता जिवंत गाडू’ अशी धमकी देत दिलीपला बेदम मारहाण करण्यात आली.

ही मारहाण इतकी जबर होती की, यात दिलीप गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, आणि दिलीपला खासगी रूग्णालयात दाखल केले.
दरम्यान, रूग्णालयात दाखल केल्यानंतर दिलीपवर उपचार सुरू होते. मात्र, दिलीपला लाथाबुक्क्यांनी इतकी बेदम मारहाण करण्यात आली होती की, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली. तसेच चतुःशृंगी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.