थरारक हत्याकांड! फॉर्च्युनर अडवून पेटवली; भाजप नेत्यासह तिघांचा जळून मृत्यू..

छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात वाळू उत्खनन आणि वाहतुकीच्या वादातून अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. भाजपचे नेते आणि माजी पदाधिकारी भारत सिंह ऊर्फ लाला सिंह यांची कार रस्त्यात अडवून पेटवण्यात आली. या भीषण हल्ल्यात भारत सिंह यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाळूच्या कंत्राटावरून आणि आर्थिक व्यवहारांवरून दोन गटांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू होता. मंगळवारी रात्री भारत सिंह आपल्या सहकाऱ्यांसोबत जात असताना हल्लेखोरांनी त्यांची फॉर्च्युनर कार दोन ट्रकच्या मधोमध अडकवली. त्यानंतर वाहनावर पेट्रोल टाकून आग लावण्यात आली.
या आगीत भारत सिंह आणि त्यांच्या दोन नातेवाईकांचा होरपळून मृत्यू झाला. तर आणखी एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ९ संशयितांना अटक केली असून, त्यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. या हत्याकांडामुळे राज्यभर खळबळ उडाली असून, आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
