मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड-अवजड वाहनांना बंदी, नेमकं कारण काय?

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची ३४५ वी पुण्यतिथी १२ एप्रिलला आहे. यादिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रायगड दौऱ्यावर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी अवजड वाहनांना बंदी घातली. गोवा महामार्गावर शनिवारी, १२ एप्रिल रोजी खारपाडा ते कशेडी दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
रायगड जिल्हा प्रशासनाने याबाबत आदेश जारी केला आहे. राज्यभरातून हजारो शिवभक्त यादिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी वाहनाने येतात. १२ एप्रिलला रायगडावर जाण्यासाठी वाहनांची गर्दी वाढणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जड-अवजड वाहतूक बंदी आदेश रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढला आहे.
तसेच यादिवशी केंद्रीय गृहमंत्री शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अनेक मंत्री देखील किल्ले रायगडावर येणार आहेत. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबत आदेश जारी केला आहे.
अमित शहा यांच्या दौऱ्यासाठी याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. अमित शहा खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी देखील जाणार आहेत. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.